Yevgeny Prigozhin – म्होरक्या ठार झाल्याचा संशय, वॅगनर ग्रुपने दिली धमकी

शियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात बंड करणारे वेग्नर या खासगी लष्करी गटाचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. खासगी विमान कोसळून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे. ही बातमी कळताच येवजेनी ज्या तुकडीचं नेतृत्व करत होते त्या वॅगनर ग्रुपने धमकी दिली आहे. आम्ही काम सुरू केलं आहे, आता बघा काय होतं ते अशी धमकी या ग्रुपने दिली आहे.

येवजेनी ज्या विमानातून जात होते, ते विमान 28 हजार फुटावरून कोसळतानाचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला आहे. रशियाच्या उत्तरेकडील भागात असलेल्या पुतीन यांच्या आलिशान महालाजवळच ही दुर्घटना घडली आहे. वॅगनर ग्रुपने म्हटलंय की जर येवजेनी यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त खरे निघाले तर बघा काय होते ते. पुतीन यांच्या निर्देशावरून क्रेमलिनमधील अधिकाऱ्यांनी हा घातपात घडवून आणला असल्याचेही या गटाच्या सैनिकांनी म्हटले आहे. येवजेनी यांच्या मृत्यूचे वृत्त खरे ठरले तर आम्ही पुन्हा मॉस्कोवर चाल करून जाऊ. स्वत:चा जीव वाचवायचा असेल तर प्रार्थना करा की येवजेनी सुखरूप असू द्या म्हणून.

दोन महिन्यांपूर्वी रशियात वेग्नर या खासगी लष्करी गटाने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात बंड पुकारले होते. मात्र तीन दिवसांतच या गटाने पांढरे निशाण फडकावले. थेट राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनाच येवजेनी प्रिगोझिन यांनी आव्हान दिले होते. परंतु काही मोजक्या अटींवर हे बंड शमले. प्रिगोझिन तसेच त्यांच्या वेग्नर गटावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नाही असे चर्चेत ठरले होते. बंडानंतर दोन महिन्यांनी प्रिगोझिन यांच्या मृत्यूचे वृत्त आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

येवजेनी प्रिगोझिन हे एकेकाळी राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या अत्यंत निकटवर्तुळातील एक मानले जात होते. उपाहारगृहे आणि खाद्यसेवा पुरवणार्‍या त्यांच्या कंपन्या आहेत. रशियन सत्ताकेंद्र क्रेमलिनलाही प्रिगोझिन यांचीच कंपनी खाद्यपुरवठा करते. त्यामुळेच पुतीन यांचे ‘शेफ’ अशीही त्यांची ओळख होती.

असा दावा केला जात आहे की येवजेनी ज्या विमानातून जात होते ते विमान क्षेपणास्त्राने मारा करून किंवा विमानात बॉम्बस्फोट घडवून आणत पाडण्यात आले. ज्यावेळी हे विमान पडले तेव्हा पुतीन दुसऱ्या विश्वयुद्धात कुर्स्कच्या युद्ध विजयदिन साजरा करत होते. हा सोहळा सुरू असतानाच पुतीन यांना येवजेनी यांच्या मृत्यूची बातमी देण्यात आली, मात्र तरीही पुतीन निर्लज्जासारखे सोहळ्यात पदके वाटत फिर होते असा आरोप येवजेनी यांच्या समर्थकांनी केला आहे. दरम्यान इंग्लंडच्या गुप्तचर यंत्रणेने डेली टेलेग्राफ या वर्तमानपत्राला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की येवजेनी प्रवास करत असलेले विमान पुतीन यांच्या आदेशानुसार रशियाच्या गुप्तचर यंत्रणेने पाडले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी या घडामोडींबाबत बोलताना म्हटले की रशियात होणाऱ्या प्रत्येक घडामोडीमागे पुतीन यांचा हात असतो. त्यामुळे मला यात आश्चर्य वाटत नाही.

दुसरीकडे येवजेनी यांच्या मृत्यूबद्दल रशियाच्या सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. येवजेनी हे फक्त फसवणूक करत होते आणि त्यांना आतापर्यंत शिक्षा का झाली नाही याचे आश्चर्य वाटत असल्याचे या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.