पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्याची डोक्यात गोळ्या झाडून हत्या

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून हिंसाचार सुरूच आहे. शनिवारी रात्री पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणामध्ये एका टीएमसीच्या कार्यकर्त्याची डोक्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. जियारुल मोल्ला (४२) असे या मृत व्यक्तीचे नाव असून गोळीबारानंतर त्याचा मृतदेह बसंती परिसरातील फुल मलंचा गावाजवळ सापडला.

पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीसाठी अवघे काही दिवस उरले असून, येथे उसळलेल्या हिंसाचारात आतापर्यंत १३ जणांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. शनिवारी रात्री फुल मलंचा गावात रस्त्याच्या कडेला जियारूल गोळ्या झाडलेल्या अवस्थेत पडलेला आढळून आला. यावेळी त्याला उचलून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जियारुल हा युवक तृणमूल काँग्रेसचा सदस्य होता, त्यामुळेच त्याला अनेकदा धमक्या दिल्या जात होत्या असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. राजकीय वैमनस्यातून झियारुल यांची हत्या झाल्याचा त्यांचा दावा आहे. यासंदर्भात आता पोलीस पुढील तपस करत आहेत.