होपने उडवली इंग्लंडची झोप, विंडीजने केला 326 धावांचा यशस्वी पाठलाग

वन डे वर्ल्ड कपसाठी प्रथमच अपात्र ठरलेल्या वेस्ट इंडीजचा कर्णधार शाय होपने अक्षरशः इंग्लंडची झोप उडवली. इंग्लंडच्या 326 धावांचा पाठलाग करताना शाय होपचा झंझावात आणि रोमारिओ शेफर्डच्या घणाघाताने जादू केली. विजयी लक्ष्य 7 चेंडू आधीच गाठत विंडीजने तीन वन डे सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

325 धावा उभारल्यानंतर इंग्लंड विंडीजवर सहज मात करील, असा सर्वांचा अंदाज होता; पण तो अंदाज कर्णधार होपने हाणून पाडला. सलामीवीर ऑलिक अॅथनेज आणि ब्रॅण्डन किंग यांनी 104 धावांची सलामी देत विंडीजच्या विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. कर्णधार शाय होपने त्या आशांवर विजयाची मोहोर उमटवण्याचा पराक्रम केला.

39 षटकांत 5 बाद 213 अशा स्थितीत असलेल्या विंडीजच्या डावाला कलाटणी दिली ती होप आणि रोमारिओ शेफर्डच्या 89 धावांच्या भागीने. दोघांनी 51 चेंडूंच्या आपल्या भागीत सहा षटकार आणि 5 चौकारांची आतषबाजी करत विंडीजला विजयाच्या उंबरठय़ावर नेले. शेफर्डने 28 चेंडूंत 3 षटकार आणि 4 चौकार ठोकले. त्याचे अर्धशतक अॅटकिन्सनमुळे हुकले, पण होपने आपले शतक अनोख्या पद्धतीने साजरे केले. शेवटच्या 2 षटकांत 19 धावांची गरज असताना होपने इंग्लंडची झोप उडवणारी फटकेबाजी केली. त्याने सॅम करनच्या चार चेंडूंत तीन षटकार ठोकत विंडीजला 7 चेंडू आधीच विजय मिळवून दिला. होपने 82 व्या चेंडूंवर आपले शतक पूर्ण केले आणि पुढच्याच चेंडूवर विजयी षटकारही ठोकला. होपने आपल्या खेळीत 7 षटकार आणि 4 चौकार मारले. शेवटच्या 61 चेंडूंत 113 धावा काढत विंडीजने इंग्लंडच्या आव्हानाचा अक्षरशः फडशा पाडला.

त्याआधी फिल सॉल्ट (45), झॅक क्राऊली (48) आणि हॅरी ब्रुक (71) यांच्या दमदार खेळीमुळे इंग्लडने 325 अशी आव्हानात्मक मजल मारली होती. यात सॉल्ट-जॅक्सने 77 धावांची सलामी, तर क्राऊली-ब्रुकने 71 धावांची भागी रचत संघाला दोनशे समीप नेले. तळाला सॅम करन आणि ब्रायडन कार्सने आठव्या विकेटसाठी 66 धावांची भागी करत संघाचे त्रिशतक फलकावर लावले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कर्णधार जोस बटलर (3) गेल्या आठ डावांत पाचव्यांदा एकेरी धावसंख्येवर बाद झाला.

धोनीच्या प्रेरणेमुळेच विजय

शेवटपर्यंत हार मानू नकोस, हा महेंद्र सिंग धोनीचा सल्लाच इंग्लंडविरुद्धच्या पाठलागाचा खरा मानकरी असल्याची कबुली कर्णधार शाय होपने दिली.  शांतपणे आपल्या लक्ष्याला गाठण्यात माहिर असलेल्या धोनीने मला सल्ला दिला होता, तू जितका विचार करतो, त्यापेक्षा अधिक आपल्याकडे असतो. गेली अनेक वर्षे धोनीचा हाच सल्ला मी खेळताना प्रत्यक्षात आजमावतो आणि शेवटपर्यंत हार मानत नाही.