खासदार संजय राऊत यांच्यावर चुकीच्या पद्धतीने दाखल केलेले गुन्हे मागे घ्या; शिवसैनिकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या

>> प्रसाद नायगावकर

दैनिक ‘सामना’ तील ‘रोखठोक’ या सदरात पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याबाबत लिखाण केल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या विरोधात उमरखेड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे राजकीयदृष्ट्या प्रेरित होऊन सूडबुद्धीने दाखल करण्यात आले असून दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यवतमाळ जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन कले.

हे गुन्हे दाखल करून घेताना उमरखेड पोलिसांनी राजकीय दबावाखाली नियमबाह्य व बेकायदेशीररित्या गुन्हे दाखल केले असून दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, अशी मागणी जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्यासह शिवसैनिकांनी केली. उमरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या उत्तराने शिवसैनिकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे ठाणेदार पांचाळ यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांना याबाबतीत माहिती दिली.प्रदीप पाडवी यांनी उमरखेड पोलीस ठाण्याला भेट देत जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्यासह शिवसैनिकांसोबत चर्चा करून आंदोलनकर्त्यांचे समाधान केले. त्यानंतर हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी जिल्हा प्रमुख प्रविण शिंदे , विशाल पांडे, नितीन शिंदे , अॅड. बळीराम मुटकुळे , राजु खामनेकर , सतिष नाईक, डॉ अजय नरवाडे , संतोष जाधव ,अरविद भोयर ,शाखा भरकाडे , प्रशांत पत्तेवार , गजेंद्रठाकरे , राजु कवाणे , गोपिचंद दोडके , निलेश जैन , तानाजी शिंदे , अनिल कांबळे , नितीन कलाने , गणेश कदम , रवि कदम , धमेंद्र मुरगुलवार यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

राजकीय दबावापोटी खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हे दाखल
उमरखेड पोलीस ठाण्याचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी राजकीय दबावापोटी व आकस बुद्धीने खासदार संजय राऊत यांच्या विरोधात चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केले असून अशा पद्धतीने कुणाच्याही तक्रारीवरून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची शिवसेना गय करणार नाही, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी दिला.