हिंदी राष्ट्रीय भाषा, साक्षीदारांनी न्यायालयात हिंदीतूनच बोलावे! सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

हिंदी ही राष्ट्रीय भाषा असून साक्षीदारांनी उत्तर प्रदेशातील प्राधिकरणासमोर साक्ष देताना ती हिंदीतूनच द्यावी असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांनी दिले आहेत. साक्षीदार हे जरी इतर राज्यातील असले तरी त्यांनी साक्ष हिंदीतूनच द्यावी असे न्यायमूर्तींनी सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील वाहन अपघात प्राधिकरणासमोर असलेले एक प्रकर इतर राज्यात सुनावणीसाठी न्यावे अशी याचिका याचिकाकर्त्यांनी केली होती. उत्तर प्रदेशातील फर्रूखाबाद इथल्या प्राधिकरणासमोर हे प्रकरण सुरू आहे. हे प्रकरण पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग येथे सुनावणीसाठी पाठवावे अशी याचिका करण्यात आली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

ज्या गाडीमुळे अपघात झाला त्या गाडीच्या मालकाने सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याचे म्हणणे होते की सगळे साक्षीदार हे सिलिगुडी (पश्चिम बंगाल)चे असून फर्रूखाबादमधील प्राधिकरणासमोर हे प्रकरण चालले तर त्यात भाषेचा अडथळा निर्माण होऊ शकतो. यावर कोर्टाने म्हटले की, “आपला देश हा वैविध्यपूर्णता असलेला देश आहे. या देशात विविध भाषा बोलल्या जातात. देशात जवळपास 22 अधिकृत भाषा आहेत. मात्र हिदी ही राष्ट्रीय भाषा असल्याने फतेहगडमधील मोटर वाहन अपघात प्राधिकरणासमोर येणाऱ्या साक्षीदारांनी आपली साक्षी ही हिंदीतूनच देणे अपेक्षित आहे. “