इंडिकेटरवर टिटवाळा; फलाटावर कल्याण लोकल, ट्रेनमधून उतरताना महिला जखमी

मध्य रेल्वेच्या भोंगळ कारभाराचा फटका प्रवाशांना वारंवार बसत आहे. रेल्वे प्रशासनाच्या गोंधळ आख्यानचा फटका आज डोंबिवलीकरांना बसला. आज डोंबिवली स्थानकात इंडिकेटरवर टिटवाळा लोकलची उद्घोषणा केल्यानंतर प्रत्यक्ष मात्र फलाटावर कल्याण लोकल लावण्यात आली. तांत्रिक बिघाड झाल्याची उद्घोषणा ऐनवेळी केल्यानंतर प्रवाशांचा गोंधळ उडाला. गडबडीत लोकलमधून उतरताना फलाटावर पडून एक महिला जखमी झाली. शोभना साठे असे जखमी महिलेचे नाव आहे.

आज सकाळी दहा वाजता डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर टिटवाळा लोकल येणार असल्याची उद्घोषणा इंडिकेटरवर केली होती. लोकल येताच अनेक प्रवासी लोकलमध्ये चढले. त्याचवेळी लोकलमध्ये चढलेल्या प्रवाशांनी ही कल्याण लोकल आहे असा गलका केला. दर्शकावर टिटवाळा आणि स्थानकात मात्र कल्याण लोकल कशी, असा प्रश्न करून लोकलमध्ये चढलेले टिटवाळ्यातील प्रवासी घाईने खाली उतरले. या गर्दीत शोभना याही उतरत असताना अचानक लोकल सुरू झाली. यावेळी उतरताना तोल गेल्याने त्या फलाटावर पडल्या. लोकल संथगतीने सुटली होती. त्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या.

मनस्तापाचे स्थानक

सर्वाधिक गर्दीचे स्थानक असतानाही डोंबिवलीत रेल्वे प्रवाशांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. डोंबिवली स्थानकात प्रवाशांना वारंवार मनस्ताप सहन करावा लागत असल्याची तक्रार मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे प्रवासी संघटनांनी केली आहे.