ज्ञानवापीला मशीद म्हणणे चुकीचे, तिथे त्रिशूळ आणि मूर्ती का आहेत? योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य

ज्ञानवापी आणि काशी विश्वनाथ मंदिर प्रकरणावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, “ज्ञानवापीला मशीद म्हटले तर वाद होईल. मला वाटते ज्याला भगवंताने दृष्टी दिली आहे, त्याने पाहावे. मशिदीच्या आत त्रिशूल काय करत आहे? ते आम्ही ठेवले नाहीत ना?, तिथे ज्योतिर्लिंगे आहेत आणि देवांच्या मूर्ती आहेत. ज्ञानवापींच्या भिंती ओरडून काय म्हणत आहेत? मला वाटतं, हा प्रस्ताव मुस्लिम समाजाकडून आला पाहिजे. ही एक ऐतिहासिक चूक झाली आहे आणि ती सुधारली पाहिजे.”

यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगालमधील पंचायत निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, “मी गेली साडेसहा वर्षे उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आहे. या काळात राज्यात एकही दंगल झाली नाही. उत्तरप्रदेशातील नगरपालिका निवडणुका, पंचायत निवडणुका आणि विधानसभा निवडणुका पहा. मग पुन्हा एकदा बंगालच्या निवडणुकीकडे बघा. तिथे काय झालं? या लोकांना देशालाच पश्चिम बंगाल बनवायचे आहे. सत्तेत आल्यानंतर काही लोकांना यंत्रणा काबीज करायची आहे.”

“पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची हत्या कशी झाली. यावर कोणी काही बोलत नाही. 1990 मध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्या झाल्या तेव्हाही हे लोक गप्प होते. योगी आदित्यनाथ यांनीही एएनआयशी बोलताना ज्ञानवापी वादावर टीकास्त्र सोडले. वास्तविक, ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. सध्या सर्वेक्षणावर बंदी असून ३ ऑगस्टला निर्णय होणार आहे.