नांदेडमधील तरुणाची मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरु असून त्यांची पदयात्रा आता मुंबईजवळ पोहचली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करणार आहेत. त्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा तापला आहे. त्यातच आता नांदेड तालुक्यातील थुगाव येथील अरविंद बालाजीराव भोसले या तरुणाने बुधवारी रात्री मराठा आरक्षणाची मागणी करत गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

नांदेड तालुक्यातील थुगाव येथील 22 वर्षांचा मराठा तरुण अरविंद भोसले याने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी करत गळफास घेत आत्महत्या केली आहे. मराठा आरक्षण मिळावे अशी मागणी करणारी चिठ्ठी लिहून बुधवारी रात्री शेतातील झाडाला गळफास घेत त्याने आत्महत्या केली. त्याच्या खिशात मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी सापडली. गावकर्‍यांना याबाबत माहिती मिळताच गावकर्‍यांनी लिंबगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांना माहिती दिली. तसेच महसूल मंडळातील लिंबगाव मंडळ अधिकारी कुणाल जगताप यांना माहिती देण्यात आली. त्यांनी पंचनामा करून पुढील कार्यवाहीसाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. गुरुवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरविंद भोसले यांच्या कुटुंबात आई-वडील व एक बहीण आहे. वडील व आई दुसर्‍याच्या शेतावर मोलमजुरी करतात. गेल्यावर्षी त्यांच्या बहिणीचे लग्न झाल्यामुळे वीस गुंठे जमीन विकली. त्यामुळे आता त्याच्याकडे स्वतःची जमीन नसल्यामुळे ते दुसर्‍याच्या शेतावर मजुरी करीत आहेत. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. समजाला आरक्षण मिळत नसल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.

घटनेची माहिती कळताच मराठा सकल मराठा समाजातील माधव देवसरकर यांनी संबंधित जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना दूरध्वनीच्या माध्यमातून संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती दिली. मराठा तरुणांनी टोकाचे पाऊल न उचलता मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण जिवंत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. शासनाने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे व यापुढे अशा आत्महत्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी, असे आवाहन या गावातील माजी सरपंच साहेबराव भोसले यांनी केले आहे.