खासदार सुजय विखे यांच्या सुरक्षारक्षकावर गुन्हा दाखल, न्यायालयाने उपलब्ध केली फिर्यादीची प्रत

sujay-vikhe patil

आमदार नीलेश लंके यांच्या ‘स्वाभिमान जनसंवाद यात्रे’त सहभागी झाल्याच्या रागातून खासदार डॉ. सुजय विखे यांचा सुरक्षारक्षक गौरव सुधाकर गर्जे याने सहकाऱयांच्या मदतीने 5 एप्रिल रोजी शहादेव भानुदास पालवे यांना मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी 11 एप्रिलला गुन्हा दाखल केला. मात्र, फिर्यादीची प्रत देण्यासही टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर न्यायालयाने फिर्यादीची प्रत उपलब्ध करून दिली.

मारहाणीच्या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्यादी शहादेव यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानंतर पोलिसांनी जबाब घेतला. तरीही गुन्हा दाखल होत नव्हता. त्यामुळे शहादेव यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी 11 एप्रिलला गुन्हा दाखल केला. मात्र, शहादेव यांना फिर्यादीची प्रत देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. अखेर न्यायालयाकडे मागणी केल्यानंतर न्यायालयाने फिर्यादीची प्रत उपलब्ध करून दिली.

यासंदर्भात शहादेव पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 5 एप्रिलला सायंकाळी शहादेव चिचोंडी येथून नीलेश लंके यांची रॅली संपल्यानंतर दुचाकीवरून जात असताना शिराळ शिवारात गौरव सुधाकर गर्जे, तसेच रामेश्वर प्रकाश पालवे, ज्ञानेश्वर प्रकाश पालवे यांच्यासह इतर दोन इसमांनी त्यांना मारहाण केली. यावेळी शहादेव यांच्या गळ्यातील एक तोळ्याची चेन आणि खिशातील रोकड काढून घेतली होती.