नगर जिल्हा सहकारी बँकेकडून पीककर्जाच्या व्याजाची वसुली

शेतकऱयांच्या पीककर्जाच्या व्याजाचे पैसे घेऊ नका, असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. या आदेशाला भाजपच्या अधिपत्याखाली असलेल्या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हरताळ फासला असून, शेतकऱयांकडून पीक कर्जाचे लाखो रुपये भरून घेतले जात आहेत. या विरोधात आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने येथील जिल्हा उपनिबंधकांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

नगर जिल्हा बँकेने चालू वर्षी 3211 कोटींचे पीककर्जाचे वाटप केले आहे. 31 मार्च अखेर शेतकऱयांनी कर्जाची रक्कम वेळेत भरून 3 लाखांपर्यंतच्या पीककर्जास शून्य टक्के व्याजदराचा फायदा घेण्याचे आवाहन बँकेचे चेअरमन, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले होते.

राज्य शासनाने पीककर्ज वसुलीला स्थगिती दिली असली, तरी शासनाने या कर्जाचे पुनर्गठण करून देण्याबाबत सूचना केल्या आहेत.  शेतकऱयांनी आपले कर्ज 31 मार्चपूर्वीच भरून शून्य टक्क्याचा लाभ घ्यावा. या मुदतीत पीककर्ज भरणाऱया शेतकऱयांना 10 एप्रिलच्या आत पुन्हा पीककर्ज जिल्हा बँक देणार आहे, असे कर्डिले यांनी सांगितले आहे.

शेतकऱयांना शून्य टक्के दराचा लाभ मिळेल, अशी आशा होती. नगर जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात असून, त्यांनी सरकारच्या नियमाला हरताळ फसला असून, शेतकऱयांकडून सर्रासपणे व्याजाची रक्कम भरून घेतली जात आहे. त्यामुळे संतप्त झालेले शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष कार्ले, माजी सभापती रामदास भोर, माजी सभापती बाळासाहेब हराळ यांनी जिल्हा उपनिबंधकांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

संदेश कार्ले म्हणाले, 14 आणि 27 मार्चला निबंधक कार्यालयातून आलेल्या पत्रात ‘शेतकऱयांकडून व्याज घेऊ नका’, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. तरीसुद्धा बँक शून्य टक्के दराने पैसे भरून घेतले जातील, असे जाहीर केले होते. मात्र, तसे न करता शेतकऱयांना पीककर्ज भरताना त्यांनी 6 टक्के व्याज लावलेले आहे. याबाबत बँकेचे सीईओ रावसाहेब वरपे याना संपर्क साधला असता, त्यांनी ही बाब चेअरमन यांच्याकडे आहे, असे  सांगत बोलण्यास नकार दिला. यानंतर जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी यांना माहिती देऊनही कोणताही निर्णय न झाल्याने संतप्त शिवसैनिक व शेतकऱयांनी उपनिबंधकांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.