लेख – ‘स्टेग’ : भारतीय सैन्याचे विशेष युनिट

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन, [email protected]

भविष्यातील युद्धांमध्ये तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल. लढाईत युनिट्स आणि फॉर्मेशन्सना समर्थन देण्यासाठी आधुनिक युद्धात नवीन उपकरणे समाविष्ट करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानातील अशी प्रगती आत्मसात करण्यासाठी भारतीय सैन्याने सिग्नल टेक्नॉलॉजी इव्हॅल्युएशन अॅण्ड अडॉप्शन ग्रुप हे ग्राऊंड ब्रेकिंग तंत्रज्ञान आधारित ‘स्टेग’ युनिट तयार केले असून ते डिजिटल डोमेनमध्ये त्याच्या क्षमतांना बळ देणारे ठरणार आहे.

तंत्रज्ञानाच्या बदलामुळे कुठले शस्त्र घ्यायचे, त्याला सैन्यात केव्हा सामील करायचे आणि असे करताना सर्वात अत्याधुनिक, पण कमी किमतीत असे तंत्रज्ञान आपल्या सैन्यामध्ये कसे येईल हे ठरवणे व ते आणणे अत्यंत महत्त्वाचे असते. याकरिता भारतीय सैन्याने सिग्नल टेक्नॉलॉजी इव्हॅल्युएशन अॅण्ड अडॉप्शन ग्रुप (स्टेग युनिट) असे एक नवीन युनिट सुरू केले आहे. भारतीय सैन्यात विघटनकारी तंत्रज्ञान (Disruptive ,Niche Technologies) म्हणजे एआय, 5 जी, 6 जी, मशीन लार्ंनग, क्वांटम तंत्रज्ञान व अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञानांवर संशोधन केले जात आहे.

स्टेग युनिट भविष्यातील विघटनकारी तंत्रज्ञानाचा शोध घेण्यासाठी समर्पित असे एक विशेष तंत्रज्ञान युनिट आहे. स्टेग लष्कराच्या सिग्नल संचालनालयाच्या अंतर्गत काम करेल आणि कॉर्प्स ऑफ सिग्नल्समधील कर्नल त्याचे नेतृत्व करतील. युनिटमध्ये सुमारे 280 कर्मचारी असतील. त्यांचे प्राथमिक उद्दिष्ट कठोर मूल्यमापन आणि भविष्यातील तंत्रज्ञानाचा वापर करून लष्कराच्या क्षमतांना चालना देणे हे आहे. स्टेग कृत्रिम बुद्धिमत्ता, 5 जी आणि 6 जी नेटवर्क, मशीन लार्ंनग आणि क्वांटम तंत्रज्ञानासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे संशोधन आणि मूल्यमापन करेल. असे केल्याने एकूण कार्यक्षमता वाढवणे हे त्याचे उद्दिष्ट असेल.

स्टेग युनिट, वायर्ड आणि वायरलेस तंत्रज्ञान अद्ययावत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या युनिटच्या माध्यमातून भारतीय सैन्यासाठी मोबाईल अॅप, वेब इत्यादी विकसित केले जाणार आहेत. स्टेग युनिट वेगाने बदलणाऱया सध्याच्या युद्धाकरिता तयार राहण्यासाठी आणि भविष्यकालीन युद्धभूमीचा विचार करून तंत्रज्ञान विकसित करण्याच्या लष्कराच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. त्यासाठी वायर्ड आणि वायरलेस सिस्टम कम्युनिकेशन आवश्यक आहे.

मोबाईल कम्युनिकेशन व्यतिरिक्त सॉफ्ट डिफाइंड रेडिओ, इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज, इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली, 5 जी आणि 6 जी नेटवर्क, क्वांटम तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लार्ंनग इत्यादी विकसित केले जात आहे. यासाठी भारतीय सैन्य उद्योग क्षेत्रातील तज्ञांशी भागीदारी करणार आहे. हे हायटेक युनिट तांत्रिक स्काऊंटिंग, मूल्यांकन, विकास, कोअर आयसीटी उपायांचे व्यवस्थापन करणार आहे आणि जगात उपलब्ध समकालीन तंत्रज्ञानाची सुधारणा करून भारतीय सैन्याला तंत्रज्ञान क्षेत्रात पुढे घेऊन जाणार आहेत. स्टेग युनिट भविष्यकालीन तंत्रज्ञानाचे संशोधन आणि मूल्यमापन करणार आहे. क्षेत्राचे बदलते स्वरूप लक्षात घेऊन लष्करी वापरासाठी शिक्षण, क्वांटम संगणक विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सोल्युशन्सचा लाभ घेणे आणि शैक्षणिक, उद्योग यांच्या सहकार्याने चांगले तंत्रज्ञान तयार करणे हे स्टेगचे उद्दिष्ट आहे. उद्याचे युद्धक्षेत्र सुरक्षित आणि मजबूत दळणवळण प्रणालींवर अधिकाधिक अवलंबून आहे. पारंपरिक पद्धतींना सतत नवीन आव्हाने निर्माण होत आहेत. स्टेगचे उद्दिष्ट आहे की, लष्कराला सर्वात प्रगत साधने उपलब्ध आहेत याची खात्री करणे. हा उपक्रम केवळ नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यापलीकडे जातो. आधुनिक युद्धामध्ये संपूर्ण रणांगणावर उच्च प्रमाणात माहितीची देवाणघेवाण आणि रिअल टाईम समन्वयाची आवश्यकता असते. सुरक्षित आणि विश्वासार्ह कम्युनिकेशन, प्रभावी आदेश आणि नियंत्रणासाठी सर्वोपयोगी आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काही प्रगत देशांची मक्तेदारी आहे. स्टेगसह भारताने संरक्षण क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने पहिले, पण धाडसी पाऊल उचलले आहे. स्टेगची स्थापना लष्कराच्या व्यापक आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांशी जुळते. आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडियाच्या तत्त्वांशी अनुरूप स्टेग एकीकडे सशस्त्र दल आणि दुसरीकडे उद्योग, शैक्षणिक क्षेत्राची मदत घेऊन आपल्या उणिवा कमी करण्यास मदत करेल. उच्च श्रेणीतील तंत्रज्ञान हे देशासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच ते आत्मसात केल्यास त्यांना अधिक स्वयंपूर्ण करणार आहेत. दळणवळण हा लष्करी ऑपरेशनचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्टेगने हाती घेतलेल्या विशिष्ट प्रकल्पांचे तपशील सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञात आहेत. मात्र असा विश्वास आहे की, हे युनिट अनेक क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

युद्धक्षेत्रासाठी वेगाने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानामध्ये उत्तम तंत्रज्ञान आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी पूर्ण भारतीय सैन्याला जोडण्याची क्षमता असणे हेसुद्धा पाकिस्तान, चीनवर मात करण्यास फायदेशीर ठरणार आहे. चिनी सैन्य 6 जी तंत्रज्ञान अंगीकारत असून भारतातही त्याला प्राधान्य देणार आहे. 6 जी तंत्रज्ञानामुळे मानवरहित लष्करी मालमत्तेवर ऑपरेटरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचे नियंत्रण ठेवता येणार आहे.