भटकंती – मुनारची कुंडला व्हॅली मोनोरेल

>> वर्षा चोपडे

मुथिरापुझा, नल्लाथन्नी आणि कुंडला या तीन पर्वतीय प्रवाहांच्या संगमावर वसलेले दक्षिण हिंदुस्थानातील प्रसिद्ध हिल स्टेशन मुन्नार हे एक रोमाण्टिक, विलोभनीय पर्यटन स्थान आहे. केरळच्या कन्नन देवन हिल्समधील मुन्नार व टॉप स्टेशनदरम्यान 1902-1908 मध्ये कुंडला व्हॅली रेल्वे मोनोरेल बांधली गेली जी मीटरगेजमधील पहिली मोनोरेल ठरली.

त्रावणकोरच्या केरळचे महाराजा उथराम थिरुनल यांनी सर्वप्रथम कोल्लम-सेनगोटाई मीटर-गेज लाइनची संकल्पना आणि अंमलबजावणी केली होती. ही मीटर-गेज लाइन दक्षिण हिंदुस्थानी रेल्वे कंपनी, त्रावणकोर राज्य आणि मद्रास प्रेसिडेन्सी यांनी संयुक्तपणे बांधली होती. 1888 मध्ये एका सर्वेक्षणानंतर, 1900 मध्ये काम सुरू झाले आणि 1902 पर्यंत पूर्ण झाले. या मार्गावर पहिली मालगाडी 1902 मध्ये, तर पहिली पॅसेंजर ट्रेन 1904 मध्ये धावण्यास सुरुवात झाली. श्रीमती ए. डब्ल्यू. जॉन यांनी पुढाकार घेऊन कुंडला व्हॅली रेल्वे मोनोरेल 1902-1908 मध्ये बांधली गेली आणि केरळच्या कन्नन देवन हिल्समधील मुन्नार व टॉप स्टेशनदरम्यान चालवली गेली.

या मोनोरेलचा उद्देश केवळ व्यापार असला तरी पुढे ती पर्यटनासाठीही वापरली गेली. ही रेल्वे चहा आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीसाठी बांधण्यात आली होती. सुरुवातीला 1902 मध्ये कार्ट रोड कट करण्यात आला, नंतर मुन्नार आणि मडुपट्टी ते टॉप स्टेशनपर्यंत चहा व इतर उत्पादनांची वाहतूक करण्याच्या उद्देशाने मुन्नार ते टॉप स्टेशनकडे जाणाऱया रस्त्यावर मोनोरेल मालवाहतूक प्रणालीने बदलली. ही मोनोरेल इविंग सिस्टिमवर आधारित होती आणि मोनोरेलचा समतोल राखण्यासाठी ट्रकवर एक लहान चाक ठेवण्यात आले होते, तर एक मोठे चाक रस्त्यावर विसावले होते. हे पटियाला स्टेट मोनोरेल ट्रेनवेजसारखेच होते. ही मोनोरेल बैलांनी ओढली. मुन्नार ते बोदिनायक्कनूरला चहा पोहोचवण्यासाठी टॉप स्टेशन हा ट्रान्सशिपमेंट पॉइंट होता. टॉप स्टेशनवर येणाऱया चहाच्या चेस्ट्स नंतर टॉप स्टेशनपासून पाच किमी (तीन मैल) खाली टेकडीवरून दक्षिणेकडील कोट्टागुडी, तामीळनाडूपर्यंत हवाई रोपवेद्वारे नेण्यात आले, जे ‘बॉटम स्टेशन’ म्हणून प्रसिद्ध झाले.

हा चहा 15 किमी (नऊ मैल) कार्टद्वारे बोदिनायक्कनूरला, नंतर रेल्वेने हिंदुस्थानातील इतर ठिकाणी आणि जहाजाने इंग्लंडला पाठवला गेला. मुन्नार ब्लेअरगॉवरी हॉल्ट येथील अभियंता जी. एस. गिल्स 1908 मध्ये मोनोरेल दोन फूट (610 मिमी) नॅरो-गेज लाइट रेल्वेने बदलली. मदुपट्टी आणि पलार येथील स्थानकांवर गाडय़ा खेचण्यासाठी हलक्या वाफेच्या इंजिनांचा वापर केला जात असे.

1 जुलै 1904 रोजी मेट्रो-गेज सेवेचे उद्घाटन करण्यात आले. त्रावणकोरचे महाराजा मूलम थिरुनल यांनी कोल्लम येथून पॅसेंजर ट्रेनला 21 तोफांची सलामी देऊन रवाना केले. ब्रिटिशांनी पश्चिम घाटाच्या पायथ्याशी वन उत्पादने, मसाले आणि काजू कोल्लम ते चेन्नई या त्यांच्या दक्षिणेकडील मुख्यालयापर्यंत नेण्यासाठी रेल्वेमार्ग बांधला होता. केरळ राज्यातील कोल्लम जंक्शन रेल्वे स्टेशन हे हिंदुस्थानातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने केरळमधील दुसरे सर्वात मोठे आणि ट्रकच्या संख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे व राज्यातील सर्वात जुन्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.

मुन्नार हे देशातील पहिले रेल्वे मार्ग असलेले ठिकाण आहे. गंमत म्हणजे हिल स्टेशन असलेल्या इडुक्की जिह्यात आजही रेल्वे कनेक्शन नाही. जगप्रसिद्ध मुन्नारला कोणतीही रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही. पण सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन अलुवा हे मुन्नारपासून 108 किमी अंतरावर आहे. वैकल्पिकरीत्या कोचीजवळचे एर्नाकुलम जंक्शन मुन्नारपासून सुमारे 125 किमी दूर आहे. दक्षिण हिंदुस्थानातील प्रसिद्ध हिल स्टेशन मुन्नार हे एक रोमाण्टिक, विलोभनीय पर्यटन स्थान आहे, या ठिकाणाला लाखो पर्यटक भेट देतात. मुन्नारचा खरा उच्चार मुनार (स्ल्ह) असा आहे. मुन्नार हे तीन पर्वतीय प्रवाहांच्या संगमावर वसलेले आहे – मुथिरापुझा, नल्लाथन्नी आणि कुंडला. ‘मुनार’ या शब्दाचा अर्थ मल्याळममधील ‘तीन नद्या’ असा होतो.

मुन्नारला जायचे असेल तर रोड ट्रान्सपोर्ट सुविधा उत्तम आहेत. कोल्लम आणि सेनगोताईदरम्यानचा रेल्वे प्रवास केरळमधील सर्वोत्तम रेल्वे प्रवासांपैकी एक आहे. हे शहर प्राचीन तसेच नैसर्गिक सौंदर्याने नयनरम्य आहे आणि केरळच्या बॅकवॉटरचे दक्षिणेकडील प्रवेशद्वार आहे. कुंडला व्हॅली रेल्वे ही हिंदुस्थानातील पहिली मोनोरेल प्रणाली होती. नंतर तिचे रूपांतर दोन फूट (610 मिमी) नॅरो-गेज रेल्वेमध्ये करण्यात आले. या रेल्वे मार्गाची लांबी 35 किमी होती. 1999 च्या महापुराने कुंडला व्हॅली रेल्वे पूर्णपणे उद्ध्वस्त केली आणि लाइन कधीही पुन्हा बांधली गेली नाही. मुन्नारला जाणारे प्रवासी आजही त्याचे विखुरलेले अवशेष पाहू शकतात.

2019 मध्ये केरळ पर्यटन विभागाने इडुक्की आणि कन्नन देवन हिल्स प्लांटेशनद्वारे आयोजित केलेल्या प्राथमिक अभ्यासानंतर दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या पंक्तीत कुंडला व्हॅली रेल्वेचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेऊन प्रस्ताव बनवला. केरळ राज्याच्या 2021 च्या अर्थसंकल्पात टी. एम. थॉमस आयझॅक यांनी टॉप टू बॉटम सर्व्हे केला. मुन्नार रेल्वे स्टेशनच्या इमारतीत आता टाटा टीचे प्रादेशिक कार्यालय आहे. भारतरत्न माननीय रतन टाटा यांनी हेरिटेज रेल्वे म्हणून रेल्वे प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी जमीन उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. हिल स्टेशनच्या पर्यटनाच्या संधींना वाव देण्यासाठी राज्य सरकारने या प्रकल्पाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. मुन्नार आणि कुंडला खोऱयात विखुरलेल्या काही अवशेषांसह आता मोडकळीस आलेल्या मोनोरेलचे पुनरुज्जीवन हा पर्यटन विभागाच्या सर्वोच्च प्राधान्पामातील प्रकल्पांपैकी एक आहे.

(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)