आभाळमाया – वाढीव दिवसाचं वर्ष

>> वैश्विक

आपल्या रोजच्या जीवनाशी खगोलशास्त्र किती निगडित आहे हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. मुळात, आपण पृथ्वी नावाच्या एका ग्रहावर राहतो. सूर्य नावाचा एक तारा आपल्या ग्रहावरच्या जीवनसृष्टीचं पोषण करतो. पृथ्वीच्या अक्षाच्या कलण्याने ऋतुचक्र बनते. त्यानुसार आपण वर्षभरातले सणवार साजरे करत असतो. आपण आज उद्या वगैरे बोलून जातो. ते रोजच्या सूर्योदयाशी संबंधित असतं. सात दिवसांचा सप्ताह किंवा आठवडा, सुमारे तीस दिवसांचा महिना असं सगळं गणित, अगदी सहजपणे आपल्या रोजच्या व्यवहारात उतरलेलं असतं. जगभरची विविध कॅलेंडर किंवा समयदर्शक आपल्याला ‘गतकाळाची’ आठवण करून देतात. ‘भविष्यकाळा’ची स्वप्नं सांगतात… पण ‘काळ’ सतत आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते म्हणून दिवस सुमारे 24 तासांचा आणि वर्ष 365 विदसांचं.

समजा, पृथ्वीची स्वतःभोवती फिरण्याची गती कमी झाली किंवा वाढली तर आपलं सगळं कालचक्राचं गणितच बदलेल. तिकडे बुध किंवा शुक्र ग्रहांवर असंच आहे. त्यांचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग सूर्याभोवती फिरण्याच्या वेगापेक्षा इतका कमी आहे की त्यांचं ‘वर्ष’, त्यांच्या दिवसापेक्षा ‘लहान’ असतं. म्हणजे एका दिवसात दोनदा वाढदिवस (…आणि परीक्षाही!) तर, काळ ‘सापेक्ष’ असतो हेच यावरून सिद्ध होतं. हे सर्व अक्षरशः क्षणोक्षणी अनुभवाला येऊनसुद्धा आपल्या ध्यानात येत नाही कारण आपण जन्मापासूनच या अज्ञात संकल्पनांच्या साथीने जगत असतो. त्याची जाणीव झाली की अचंबा वाटतो.

मात्र, कालगणेचा आरंभ झाल्यापासून जगात अनेक प्रकारच्या समयदर्शिका अस्तित्वात आल्या. त्याचे मुख्य आधार होते सूर्य आणि चंद्र आपल्या देशी पंचांगांमध्ये बहुतेक ठिकाणी चंद्राचं महत्त्व अधिक आहे. चंद्राच्या प्रतिपदेला आपला मराठी महिना सुरू होतो आणि अमावास्येला संपतो. याउलट काही पंचांगातली कालगणना पौर्णिमेनंतर येणाऱया प्रतिपदेला सुरू होते आणि पुढच्या पौर्णिमेला संपते. ‘तिथी’ किंवा ‘दिनांक’ अथवा ‘तारीख’ नाहीतर ‘डेट’ कुठूनही सुरू करा चंद्र पृथ्वीभोवती साडेसत्तावीस दिवस आणि पृथ्वी सूर्याभोवती 365 दिवसातच फिरणार. आपापल्या भूभागातलं ऋतुमान आणि त्यावर आधारित जीवनपद्धतीचा तिथलं ‘पंचांग’ किंवा कॅलेण्डर बनवण्यात महत्त्वाचा वाटा सिद्ध करते.

सध्या आपण व्यवहारात युरोपीय ‘ग्रेगरियन’ कॅलेण्डर वापरतो ते जानेवारी ते डिसेंबर या 12 महिन्यांचे असते. आपले सणवार, सांस्कृतिक कार्यक्रम मात्र चैत्र ते फाल्गुन या बारा महिन्यांच्या चांद्र – समयदर्शकावर आधारित महिन्यांमध्ये होतात. आपल्या देशात या दोन्हीची सांगड घालून आपण कालक्रमण करतो. मकरसंक्रांत हा एकच सण ‘सौर’ कॅलेण्डरप्रमाणे येतो. हा अपवाद वगळता बाकीचं मराठी वर्ष ‘चैत्र ते फाल्गुन’ असंच ‘सण’ साजरे करत असतो. देशातही या गणनेच्या आरंभकाळात फरक आहे. कर्नाटकात आपल्या चैत्रपाडव्याप्रमाणेच ‘उगादी’ने वर्षारंभ होतो पण गुजरातचं ‘साल मुबारक’ दिवाळातल्या पाडव्याला सुरू होते.

नकळत, अंगवळणी पडलेल्या या कालगणनेची माहिती होत असताना, इंग्रजी कॅलेण्डरप्रमाण दर चार वर्षांनी येणाऱया ‘लीप’ इयरची आठवण झाली. कारण हे वर्ष म्हणजे 2024 ‘लीप इयर’ आहे. गेल्या गुरुवारीच 29 फेब्रुवारी ही चार वर्षांमधून एकदा येणारी इंग्लिश तारीख येऊन गेली. पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणाचा कालखंड अगदी योग्य ठेवायचा तर, दर चार वर्षांनी आणि ज्या शतकांना 100 ने भाग जाईल अशा शतकाच्या अखेरीस एकक दिवस (24 तास) अधिक येतो. इंग्लिश कॅलेण्डरची पृथ्वीची सूर्यप्रदक्षिणा या ‘लीप इयर’मुळे बरोबर होते. कारण दिवस 24 तासांचा म्हटला तरी तो प्रत्यक्षात 23 तास 56 मिनिटे एवढा तर वर्ष 365 दिवसांचं म्हटलं तरी ते 365.24 दिवसांचं असतं. ते तसंच ठेवलं तर अनेक वर्षांनी 21 मार्चच्या वसंतसंपात बिंदूस आणि कालगणनेत फरक पडेल. कधी कधी असं वाटतं की त्यानुसारच महिन्याची गणना का नसते? आम्हाला शाळेत एक कोडं घालायचे. ‘एजूसनो-30’ म्हणजे काय? …तर एप्रिल, जून, सप्टेंबर, नोव्हेंबर हे ‘तिशी’ महिने असतात. उरलेले 7 महिने एकतिशी आणि 1 महिना 28 किंवा 29 दिवसांचा. तशी ‘थर्टी डेज हॅज सप्टेंबर, एप्रिल, जून ऍण्ड नोव्हेंबर’ अशी कविताही आहे.

आपल्या चांद्र कालगणनेची सांगड सौरवर्षाशी घालावीच लागते. त्यासाठी आपण दर तीन वर्षांनी एक ‘अधिकमास’ समयदर्शिकेत आणतो. चांद्र-सौर कालगणनेतला दर वर्षाचा सुमारे 10 ते 11 दिवसांचा फरक त्यामुळे योग्य होतो आणि सणवार करता येतात. म्हणूनच आपल्या दिवाळीच्या इंग्लिश तारखा दरवर्षी 10 दिवसांनी पुढमागे होतात. युरोपात रोमन ज्युलियन कॅलेण्डर प्रचलित असताना पृथ्वीच्या सूर्याभोवती होणाऱया भ्रमणाशी ताळमेळ बसेना म्हणून 1582 मध्ये पोप ग्रेगरी यांनी त्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यातले 12 दिवस कमी करून कॅलेण्डरची सुधारणा केली. तेच कॅलेण्डर आपण सध्या व्यवहारात वापरतो. लोकमान्य टिळक यांनी आपल्या पंचागात सुधारणा करून ‘संक्रांत’ 10 जानेवारीला ठरवली होती. 1957 मध्ये आपल्या सरकारने शास्त्रज्ञ मेघनाद साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या सांगण्यानुसार ‘भारतीय सौर दिनांक’ सुरू केला परंतु जागतिक जनमतामुळे या कालगणना व्यवहारात टिकल्या नाहीत. सौर दिनांकाला आपल्याकडे कायदेशीर आधार आहे पण तो सकाळी रेडिओवर सांगण्यापलीकडे त्याचा व्यावहारिक उपयोग जाणवत नाही. ‘लीप इयर’ मात्र सर्वांना माहीत असतं. हासुद्धा ‘काळा’चा महिमा!

[email protected]