जागावाटपावरून महायुतीत पुन्हा भूकंप होणार – बाळासाहेब थोरात

भाजप हा घाबरलेला असून त्याच्यात नवीन काहीही करण्याचं धाडस नाही. जागावाटपावरून महायुतीत भूकंप होणार आहे, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. नाशिक येथे भारत जोडो न्याय यात्रेत ते बोलत होते.

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशकामध्ये पोहोचली आहे. नाशिकमध्ये आज त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेऊन पूजाही केली. आज त्यांच्या यात्रेचा नाशिकमध्ये मुक्काम असणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काढलेली भारत जोडो न्याय यात्रा केवळ महाराष्ट्राच्या फायद्यासाठी नसून देशाच्या फायद्यासाठी आहे. मणिपूरपासून सुरू झालेली यात्रा नाशिकमध्ये प्रचंड जल्लोषात पोहोचली. सर्वत्र जल्लोष पाहायला मिळाला, ठिकठिकाणी राहुल गांधी यांचं स्वागत करण्यात आलं, अशी माहितीही थोरात यांनी यावेळी दिली.

भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या उमेदवार यादीवरही त्यांनी टीका केली. काहीतरी नवीन दिसेल असं वाटलं होतं पण काहीही नवीन करण्याचं धाडस भाजपमध्ये नाही. भाजप सध्या घाबरलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. जागा वाटपावरून महायुतीत भूकंप होणार आहे, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केला. येत्या निवडणुकीत बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार असून लोक पुन्हा काँग्रेसकडे, आघाडीत येत आहेत. जनतेची भावना महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचंही थोरात यावेळी म्हणाले.