मोठी बातमी – छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश, 29 नक्षलवाद्यांचा खात्मा

फाईल फोटो

छत्तीसगढमधील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांना मोठे यश आले आहे. जवान व नक्षलवाद्यांमध्ये छोटेबेठीया जंगलात झालेल्या चकमकीत 29 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.  या चकमकीत आतापर्यंत तीन जवान जखमी झाले आहेत.

छोटेबाठीयाच्या जंगलात टॉपचे नक्षल शंकर, ललिता व राजू दिसून आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास या जंगलात शोध मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेदरम्यान झालेल्या चकमकीत 18 नक्षलवादी ठार झाले तर तीन जवान जखमी झाले आहेत. अद्याप या भागात शोध मोहीम सुरू असल्याचे बस्तरचे पोलीस महानिरिक्षक पी. सुंदरराज यांनी सांगितले.

या चकमकीत टॉपचा नक्षलवादी शंकर राव हा देखील मारला गेल्याचे समोर आले आहे. शंकर राव याच्या डोक्यावर तब्बल 25 लाख रुपयांचे बक्षिस होते. घटनास्थळावरून चार एके 47 रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.

देशात लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या सत्राचे मतदान हे 19 एप्रिलला होणार आहे. कांकेर जिल्ह्यात देखील याच दिवशी मतदान होणार आहे. मतदानाच्या वेळी काही घातपात घडू नये म्हणून राज्यातील अतिसंवेदनशील भागात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात देखील या जंगलात एक चकमक झाली होती. या चकमकीत नक्षलवाद्यांच्या एका टॉपच्या कमांडरचा खात्मा करण्यात आला होता. तर एक जवान शहीद झाला होता.