हत्येच्या गुन्ह्यातील बोगस मुन्नाभाई गजाआड

हत्येच्या गुह्यात फरार असलेल्या मुन्नाभाईला क्राईम ब्रँच युनिट–12 ने बेडय़ा ठोकल्या. परवेझ अब्दुल अजीज शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल आहे. शेख हा पूर्वी एका डॉक्टरकडे सहाय्यक म्हणून काम करत होता. त्यामुळे त्याला कोणत्या रुग्णाला कोणते औषध द्यायचे हे माहीत होते.

मालवणी येथे एक तोतया डॉक्टर कार्यरत असल्याची माहिती युनिट-12 च्या उपनिरीक्षिका निलोफर शेख यांना मिळाली. प्रभारी पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक बाळासाहेब राऊत, सहाय्यक निरीक्षक विजय रासकर, निलोफर शेख, विशाल मोहिते आदी पथकाने तपास सुरू केला. शेख याचे पथक मालवणीच्या खान इस्टेट येथे गेले. तेथे अजीज पॉली क्लिनिक नावाच्या दवाखान्यात पाच जण बसलेले होते. पोलीस जेव्हा त्या दवाखान्यात शिरले तेव्हा परवेझ हा एका वृद्ध रुग्णाला इंजेक्शन देत होता. पोलिसांनी त्याच्याकडे वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली. तेव्हा त्याने प्रमाणपत्र नसल्याचे पोलिसांना सांगितले.   परवेझविरोधात गेल्या वर्षी मुलुंड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद होता. तसेच त्याच्या विरोधात कापूरबावडी, मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.