शिवसेनेने कार्यालय बळकावण्याचा मिंध्यांचा डाव हाणून पाडला

वर्षानुवर्षे शिवसेनेकडे असलेले कामकाज कार्यालय मिंधे गटाचे आमदार तुकाराम काते, त्यांचे पुत्र यांनी आज पोलीस आणि म्हाडा अधिकाऱ्यांच्या आडून बळकावण्याचा प्रयत्न केला, मात्र हा डाव चेंबूरच्या झुंजार, जाँबाज शिवसैनिकांनी हाणून पाडला. सकाळी साडेअकरा वाजता झालेल्या या संघर्षामुळे चेंबूर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

चेंबूरमध्ये वॉर्ड नंबर 146 मध्ये पांजरापोळ सर्कल असून इथे अनेक वर्षांपासून शिवसेनेचे कामकाज कार्यालय आहे. इथे इतर अनेक कामकाजासह शिवसेना शाखेचेही काम चालत होते. आमदार तुकाराम काते यांनी या कार्यालयाचे काही प्रमाणात नूतनीकरण केले होते. सहा महिन्यांपूर्वी मिंधे गट भाजपच्या दावणीला बांधला गेल्यानंतर काते यांनी या कार्यालयाला स्वतःचे टाळे ठोकले. ही बाब शिवसैनिकांना समजताच शिवसेनेने विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली टाळय़ावर टाळे ठोकून मिंधे गटाच्या मनमानीला आळा घातला. त्यानंतर या विरोधात पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूने तक्रार दाखल करण्यात आल्या होत्या.

पूर्ण कार्यालय ताब्यात घेण्याचे षड्यंत्र

आमदार तुकाराम काते आणि त्याच्या पुत्राने आज हे कार्यालय उघडून ताब्यात घेण्याचे षड्यंत्र आखले होते. सकाळपासून पोलिसांचा मोठा फौजफाटा कार्यालयाबाहेर होता, मात्र नंतर पोलिसांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली. त्यानंतर म्हाडा कर्मचारीही उपस्थित राहिले. यामुळे शिवसैनिक संतापले आणि 300-400 शिवसैनिक कार्यालयाभोवती गोळा झाले. त्यामुळे चेंबूरमध्ये तणाव निर्माण झाला होता.

शिवसैनिकांनी रुद्रावतार धारण केला

चेंबूरमध्ये अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या वास्तूत वाचनालय, ज्येष्ठ नागरिक कट्टा, शाखा तसेच इतर अनेक उपक्रम राबवले जात होते, मात्र मिंधे गटाने अचानक टाळे ठोकल्यामुळे हे सर्व बंद झाले होते. त्यात आज मिंधे गटाच्या काते यांनी हे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी केलेल्या हालचालीमुळे शिवसैनिकांनी रुद्रावतार धारण केला. मात्र जागेबाबत दोन्ही बाजूने एकमत झाल्याने आणखी संघर्ष टळला आणि पूर्ण कार्यालय घशात घालण्याचा डाव विभागप्रमुख प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी उधळून लावला. विभाग महिला संघटक पद्मावती शिंदे, विधानसभा संघटक निमेश भोसले, संजय नाटे, माजी नगरसेवक अनिल पाटणकर, निधी शिंदे, श्रीकांत शेटये, रामदास कांबळे, उपविभागप्रमुख राजेंद्र पोळ, सुरेश लांडगे, प्रशांत म्हात्रे, महेंद्र नाकटे, विधानसभा निरीक्षक सुमित्रा नेमाडे, विभाग अधिकारी विजय भोईर, दीपक चव्हाण, शाखाप्रमुख अविनाश शेवाळे, कल्पना टिकेकर यांनी मिंधे गटाला टक्कर देत रोखले.