अशी शर्यत…    नको रे बाबा

>>चंद्रहास रहाटे, आर्थिक सल्लागार

1 आजचा साधारण दैनंदिन खर्च

2 भविष्यातील गरजांचा खर्च

3 आलिशान जीवनशैलीचा खर्च

4 वायफळ खर्च

दुसरा उंदीर धावतोय म्हणून आपणही त्याला हरविण्यासाठी जीव तोडून धावायचे. मग या धावण्यामागे आपला फायदा होणार आहे की तोटा, याचा मुलाहिजा न ठेवता फक्त धावायचे. या उंदीर शर्यतीचा (रॅट रेस) आर्थिक नियोजनाशी काय संबंध आहे?

रॅट रेस शर्यत कशी सुरू होते हे पाहण्यासाठी खर्चाच्या चार भागांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. भाग 1 म्हणजे आपल्या दैनंदिन गरजांचा. भाग 2 म्हणजे भविष्यातील गरजांचा. भाग 3 म्हणजे आलिशान जीवनशैलीचा आणि भाग 4 जो आहे तो वायफळ खर्चाचा. समजा भाग 2 मधील भविष्यातील गरजांकडे दुर्लक्ष करून जो कुणी भाग 3 मधल्या आलिशान जीवनशैलीवर व भाग 4 मधल्या वायफळ गोष्टींवर जर कुणी खर्च करत असेल तर कालांतराने भाग 2 मधील मोठे खर्च भाग 1 च्या दैनंदिन खर्चाचा भाग होतील, म्हणजे काय अवस्था होईल हे तुम्हीच समजा.

माझा मित्र ऍपल फोन वापरतो, मग माझ्याकडे त्याच्यापेक्षा पण चांगला फोन असायला हवा. शेजाऱयाकडे असलेली महागडी ब्रँडेड बाइक किंवा कार आपल्याला या शर्यतीत भाग घ्यायला प्रेरित करते. नातेवाईक व मित्रांनी फेसबुकवर टाकलेला आंतरराष्ट्रीय सहलीचा फोटो किंवा व्हिडीओ आपला जीव कासावीस करतो. मग खिशाला परवडत असेल तर ठीक, नाही तर कर्जाचा डोंगर उभारून आपण त्या सर्व आलिशान गोष्टी आपल्या जीवनात आणतो. मग एक कर्ज फेडण्यासाठी दुसरे कर्ज व दुसरे कर्ज फेडण्यासाठी तिसरे कर्ज अशी कर्जाची मालिका सुरू होते.

जेव्हा रॅट रेसमध्ये सहभाग घेतो तेव्हा क्रेडिट कार्ड आपल्याला मित्र वाटायला लागतो. मिनिमम बॅलेन्सच्या नादात व्याजावर व्याज वाढत जाते. मग क्रेडिट कार्डवाल्यांच्या तसेच बँकेच्या कर्मचाऱयांचे वसुलीसाठी फोन यायला लागतात आणि मग कळून चुकते इतरांशी स्पर्धा करण्याच्या नादात आपण चक्रव्यूव्हात फसलो गेलोय. आयुष्यातली मनाची शांतता पूर्ण निघून गेलीय.

त्यामुळे मित्रांनो सावध व्हा. या  शर्यतीपासून स्वतःला व  कुटुंबाला वाचवा. स्वप्ने मोठी बघा, पण जीवनशैली स्वीकारताना आपल्या कमाईचा अंदाज घ्या. आर्थिक शिस्त लागण्यासाठी आधी 30 टक्के ते 40 टक्के भाग आपल्या भाग 2 मधील कमी, मध्यम व लांब पल्ल्याच्या उद्देशांसाठी बाजूला काढा. कर्जाचा हप्ता उत्पनाच्या 30 टक्क्यांपेक्षा कमी ठेवा व उरलेल्या पैशांत आपली जीवनशैली साकारा.