पुढील काही वर्षात भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल! उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने राजकारण ढवळून निघालं आहे. अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर असून त्यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. दरम्यान, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपमध्ये आत्मविश्वास नसल्याने ते फोडाफोडी करत आहेत, अशी जबरदस्त टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे सध्या राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये शिवसैनिकांना भेटून संवाद साधत आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसंवाद मेळाव्याला संबोधित करताना अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, अशोक चव्हाणांचं आश्चर्य वाटतं. कालपरवापर्यंत जागावाटपामध्ये हिरीरीने सहभाग घेत होते. मग आज असं अचानक काय घडलं की, अशोक चव्हाण तिकडे जात आहेत, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केलं. ‘निवडणूक आयोगाने शिवसेना चोराच्या हातात दिली, राष्ट्रवादी काँग्रेसही चोराच्या हातात दिली. आता काँग्रेससुद्धा अशोकरावांच्या हातात देतात की काय हे पाहावे लागेल. कारण हे काहीही करू शकतात. विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटताहेत. बेटकुळ्या तर काय येतच नाहीयेत, बेटकुळ्यासुद्धा भाड्याने घ्याव्या लागत आहेत’, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, संसदेमध्ये सुद्धा पंतप्रधानांनी भाषण केलं. अबकी बार एवढे पार, अबकी पार तेवढे पार, मग जर एवढे पार असतील तर मग ही फोडाफोडी का करत आहात. तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाही आहे. तुम्ही 400 पार काय, 40 पार पण होणार नाही आहात. म्हणून मग तिकडे नितीश कुमारांना घेतलं जातंय, इकडे अशोक चव्हाणांना घेतलं जातंय. अजित पवारांना घेतलं. मिंधेंना घेतलं. भाजपने दहा वर्षे जर प्रामाणिकपणे काम केलं असतं, तर ही वेळ आली नसती. सगळी भाडोत्री लोकं घेतली जात आहेत. बाजारबुणगे घेतले जात आहेत आणि ते भाजपमधले निष्ठावंत आज सतरंज्या उचलत आहेत त्यांच्या बोडक्यावर बसवले जात आहे’, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

काँग्रेसव्याप्त भाजप…

‘काही वर्षांपूर्वी काँग्रेसमुक्त भारत असा भाजपचा नारा होता. मात्र आता आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेताहेत की, आता काँग्रेसव्याप्त भाजप अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. आणखी काही वर्षांनी असंही होईल की, भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल’, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

काँग्रेस काय किंवा इतर कोणतेही पक्ष तुम्ही ज्या पद्धतीने नष्ट करायला निघाला आहात हा नतद्रष्टपणा महाराष्ट्रातील जनता बघते आहे, असा इशाराही देखील त्यांनी यावेळी दिला.