काँग्रेसविरुद्ध रडीचा डाव; आयकर विभाग 524 कोटी वसूल करण्याच्या तयारीत

देशभरात ‘इंडिया’ आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यामुळे हादरलेल्या केंद्र सरकारकडून विरोधी पक्षांना केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून नामोहरम करण्याचे कारस्थान सुरू असून आता काँग्रेसविरोधात रडीचा डाव सुरू करण्यात आला आहे. काँग्रेसकडे बेहिशेबी मालमत्ता असल्याचे सांगत आयकर विभागाने काँग्रेसला 523.87 कोटी रुपये इन्कम टॅक्स भरण्यासाठी नोटीस बजावली आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर 523 कोटी भरण्याची नोटीस आल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

देशात ‘इंडिया’ आघाडीत काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष आहे. काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला देशभरात मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे आता इन्कम टॅक्स विभागाआडून काँग्रेसला अडचणीत आणण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केल्याचे बोलले जात आहे. आयकर विभागाने काँग्रेसवर 2014 ते 2021 या कालावधीतील एकूण 523.87 कोटी रुपये ‘बेहिशेबी मालमत्ता’ असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसकडून काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या बँक खात्यामधून 135 कोटी रुपये काढण्यात आले होते. यानंतरच इतक्या मोठय़ा रकमेचा इन्कम टॅक्स भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, आयकर विभागाने 7 एप्रिल 2019 ला 52 ठिकाणी छापेमारी केली होती. यावेळी निवडणूक आयोगानेदेखील टॅक्स भरणा प्रकरणात छुपाछुपी केल्याचे सांगत ‘सीबीआय’ चौकशीचे आदेश दिले होते.

काँग्रेसला ‘अपंग’ करण्याचा प्रयत्न
ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. तर इतकी मोठी रक्कम भरावी लागल्यास पक्षाच्या आर्थिक स्थितीला मोठा धक्का बसणार असल्याचे काँग्रेसचे राज्यसभा खासदार विवेक तन्खा म्हणाले आहेत. निवडणुकीआधी 135 कोटी रुपये जप्त करूनही त्यांचे समाधान झालेले नाही. त्यामुळे काँग्रेसला आर्थिकदृष्टय़ा ‘अपंग’ करण्याचे हे कारस्थान सुरू आहे.

राजकीय हेतूनेच कारवाई – दिग्विजय सिंह
इतक्या मोठय़ा प्रमाणात टॅक्स भरण्याची नोटीस आल्यामुळे काँग्रेसकडे निवडणूक लढण्यासाठीदेखील पैसे नसल्याचे काँग्रेस नेते खासदार दिग्विजय सिंह यांनी सांगितले. ही कारवाई म्हणजे फक्त राजकीय हेतूनेच झाल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांना निवडणुकीसाठी, प्रचारासाठी, रॅलीसाठी पैसेच शिल्लक राहू नये असाच यामागे डाव आहे.