महाविकास आघाडी म्हणून आम्ही ठाम आहोत – विश्वजीत कदम

 ‘महाविकास आघाडी धर्म म्हणून निभावू. जे व्हायचं ते सगळं होऊन गेले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही ठाम आहोत’, असे काँग्रेसचे नेते, आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगितले. सांगली लोकसभा मतदारसंघातील पलूस तालुक्यात महाविकास आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. आघाडीतील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी एकसंघ मिळून प्रचाराचा प्रारंभ केल्याने वातावरण बदलल्याचे चित्र आहे.

काँग्रेस नेते, आमदार डॉ. विश्वजीत कदम, आमदार अरुण लाड हे एकत्र येत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासह रस्त्यावर उतरले. वसगडे, खटाव, ब्रह्मनाळ, माळवाडी, भिलवडी, अंकलखोप येथे त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. या वेळी चंद्रहार पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार संभ्रम न बाळगता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन डॉ. कदम यांनी केले.

‘महाविकास आघाडी धर्म म्हणून निभावू. जे व्हायचं ते सगळं होऊन गेले. महाविकास आघाडी म्हणून आम्ही ठाम आहोत,’ असे सांगत आमदार विश्वजीत कदम म्हणाले, ‘खोटं बोल, पण रेटून बोल’, असे भाजपचे सुरू आहे. जे पक्ष सोडून गेले. त्यांच्या अडचणी असतील. पण, राज्यात महाविकास आघाडीचे बहुतांश उमेदवार निवडून येतील. कडेगावच्या मातीत चंद्रहार पाटील महाराष्ट्र केसरी झाले. तसेच पलूस-कडेगावमधूनही त्यांना मताधिक्य देऊ या’, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार लाड म्हणाले, ‘सध्या भाजपचे नाही, मोदींचे शासन आहे. त्यांनी पक्षालाही दुय्यम स्थान दिले. राजेशाही आणत आहेत. आम्ही लोकांसाठी नेहमी रस्त्यावर उतरतो, तर मोदी देशातील 5 टक्के लोकांसाठी उरलेल्या 95 टक्के लोकांचा पैसा वापरत आहेत. आणखी 30 वर्षे द्या, असे ते म्हणत आहेत. म्हणजे यांनी देशाची वाटच लावायची ठरवली आहे. त्यामुळे यंदा महाविकास आघाडीचे उमेदवार  चंद्रहार पाटील यांना बळ देऊ या’, असे आवाहन त्यांनी केले.

चंद्रहार पाटील म्हणाले, ‘जिह्याला पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून देण्याचा मान मी मिळवला. आता खासदारकीचा मान सामान्य कुटुंबातील मातीची सेवा करणाऱयाला द्या’, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, शिवसेनेचे विनायक गोंदिल आदी उपस्थित होते.