कामासाठी पाच हजारांची लाच घेतली, जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याच्या दोघा अंमलदारांविरोधात गुन्हा

आधारकार्डवरील नमूद पत्त्यावर पत्नी व मुलगा राहत नसल्याने त्याच पत्त्यावर दोघे राहत असल्याचे दाखवून पासपोर्टसाठी आवश्यक पडताळणी पूर्ण करण्याकरिता पोलिसांनी एका व्यक्तीकडे सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यातील दोघा अंमलदारांनी पाच हजार घेतल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अॅण्टी करप्शन ब्युरोमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई नीलेश शिंदे आणि हवालदार साहेबराव जाधव अशी त्या दोघा पोलिसांची नावे आहेत. जीवक (नाव बदललेले) यांनी त्यांची पत्नी व मुलाचा पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज केला होता. पासपोर्टसंदर्भात पडताळणी करण्यासाठी त्यांना जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यानुसार जीवक यांनी पोलीस ठाण्यात जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. मात्र जीवक यांची पत्नी व मुलगा त्यांच्या आधारकार्डवर नमूद पत्यावर राहत नव्हते. त्यामुळे दोघे आधारकार्डवरील पत्त्यावर राहत असल्याचे दाखवून पडताळणी पूर्ण करून देण्यासाठी शिंदे यांनी पैशांची मागणी केली. पण लाच द्यायची नसल्याने जीवक यांनी शिंदेविरोधात अॅण्टी करप्शन ब्युरोकडे लेखी तक्रार दिली. त्यानुसार अॅण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने तक्रारीची खातरजमा केली असता शिंदे यांनी तडजोडीअंती पाच हजारांची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी शिंदे यांनी सांगितल्याप्रमाणे जीवक यांनी लाचेची रक्कम शिंदे यांच्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये आणून ठेवली. त्यावेळी साहेबराव जाधव हे तेथे कामकाज करत बसले होते. त्यानंतर जाधव यांनी सदरची लाचेची रक्कम टेबलच्या ड्रॉवरमधून घेतली. मग एका पिशवीमध्ये घालून टेबलच्या ड्रॉवरखाली असलेल्या कप्प्यात ठेवली. अशा प्रकारे नीलेश शिंदे यांना लाचस्वीकारण्यास जाधव यांनी सहाय्यक केले. त्यामुळे शिंदे व जाधव यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 कलम 7, 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.