बिबट्याचे हल्ले थांबेनात; प्रसंगावधान राखत तरुणाचा प्रतिकार

आंबेगाव तालुक्यातील बिबट्याचा वाढता प्रादुर्भाव काही कमी होत नसून आज आदित्य वाघ या 19 वर्षीय युवकावर बिबट्याने हल्ला केला मात्र युवकाने प्रसंगावधान राखत प्रतिकार करत बिबट्याच्या तावडीतून सुटका केली ही घटना रांजणी येथे आज सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे.

रांजणी आंबेगाव वाकोबा वस्ती येथील आदित्य जनार्दन वाघ हा आपल्या जनावरांसाठी शेतातील गवत कापण्यासाठी जात असताना बाजूला असलेल्या उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने आदित्य वर हल्ला करण्याचा प्रयत्न केला बिबट्याला पाहताच आदित्य जरी घाबरला होता तरी त्याने त्या अवस्थेत बिबट्याच्या हल्ल्यावर प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने आरडाओरड करत नागरिकांना आवाज दिला, मात्र शेतापासून वस्ती लांब असल्याने त्याच्या मदतीला कोणीही येऊ शकले नाही. भेदरलेल्या अवस्थेत आदित्य घरी पोहोचला व ही घटना वडिलांना सांगितली, सदर झालेल्या घटनेची माहिती माजी सरपंच गोविंद वाघ यांनी वनविभागाला दिली डॉक्टर संजय घाडगे यांनी प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.

आदित्य वाघ यांच्या खांदा, मानेवर बिबट्याने ओरखडे घेतले आहेत. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस यांच्या सूचनेनुसार वनपाल प्रदीप कासारे, वनरक्षक सूर्यकांत कदम, वन कर्मचारी महेश टेमगिरे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सध्या तालुक्याच्या पूर्व भागात सर्वत्र ऊस तोडणी हंगाम मोठ्या प्रमाणावर सुरू असल्यामुळे त्या ऊसात राहणारे बिबटे सैरभैर होत आहेत, नागरिकांनी शेतात जाताना तसेच रहदारी करताना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन वनपरिक्षेत्राधिकारी स्मिता राजहंस यांनी केले आहे.