Lok Sabha Election 2024 – काँग्रेसची पाचवी यादी जाहीर, चंद्रपूरच्या उमेदवारावर शिक्कामोर्तब

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने पाचवी यादी रविवारी रात्री जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील एका जागेचा समावेश आहे. चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसने प्रतिभा धानोरकर यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघातून काँग्रेस नेते, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर आणि त्यांच्या मुलीच्या नावाचीही चर्चा होती. मात्र त्या अफवाच असल्याचे स्पष्ट झाले.

Pratibha Dhanorkar या वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा धानोरकर यांच्या पती बाळु धानोरकर यांनी चंद्रपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. महाराष्ट्रातून काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेत जाणारे ते एकमेव खासदार होते, मात्र 30 मे 2023 रोजी त्यांचे निधन झाले. आता या जागेवरून काँग्रेसने त्यांच्या पत्नीला मैदानात उतरवले आहे. त्यामुळे येथे भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर असा थेट सामना होणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातून आतापर्यंत काँग्रेसने 12 उमेदवारांची घोषणा केली आहे. कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती, सोलापूरहून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर, अमरावतीहून बळवंत वानखेडे, लातूरहून शिवाजीराव कलगे, नांदेडहून वसंतराव चव्हाण, नंदूरबारहून गोवाल पडवी, रामटेकमधून रश्मी बर्वे, नागपूरमधून विकास ठाकरे, भंडारा-गोंदियामधून प्रशांत पडोळे, गडचिरोलीमधून नामदेव किरसान आणि चंद्रपूरहून प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.