Lok sabha Election 2024 : भाजप सरकारचं सत्य तरुणांना समजलंय; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप आणि टीका होत आहेत. राजकीय पक्षांकडून वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत. अशातच आता काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी बेरोजगारीच्या मुद्ध्यावरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. सोशल मीडिया साइट एक्सवर ट्विट करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी 2024 चा इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट दाखवत त्यांनी बेरोजगारीच्या प्रश्नावर भाष्य केले आहे. “हिंदुस्थानमध्ये जेवढे बेरोजगार आहेत, त्यापैकी 83 टक्के बेरोजगार हे तरुण आहेत. 2000 मध्ये एकूण बेरोजगारांमध्ये सुशिक्षित तरुणांचा वाटा 35.2 टक्के होता. मात्र 2022 मध्ये या प्रमाणात दुप्पट वाढ होऊन 65.7 टक्के झाली आहे”, असे म्हणत प्रियंका गांधी यांनी बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याचे अधोरेखीत केले.

“सरकार बेरोजगारीची समस्या सोडवू शकत नाही’ असे पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणत आहेत. हेच भाजप सरकारचे सत्य आहे. भाजप रोजगार देऊ शकत नाही हे आज देशातील प्रत्येक तरुणाला समजले आहे”, असे म्हणत भाजप तरुणांना फसवत असल्याचे प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.

भाजप तरुणांसाठी काहीही करू शकत नाही, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे युवकांना रोजगार देण्यासाठी काँग्रेस पक्षाने ठोस योजना जाहीर केल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले आहे. “30 लाख रिक्त सरकारी पदे तात्काळ भरली जातील, प्रत्येक पदवीधर/डिप्लोमा धारकाला प्रतिवर्ष 1 लाख रुपयांची अप्रेंटिसशिप, पेपरफुटीच्या समस्यांना आळा घालण्यासाठी कठोर कायदा करणार, गिग कामगारांना सामाजिक सुरक्षिततेची हमी, स्टार्ट अपसाठी 5000 कोटी रुपयांचा राष्ट्रीय निधी तयार केला जाईल. या योजनांच्या माध्यमातून काँग्रेस तरुणांना ठोस रोजगार देईल”, असे आश्वासन प्रियंका गांधी यांनी दिले.

“काँग्रेस सरकार रोजगार क्रांतीच्या माध्यामातून देशातील तरुणांचे हात बळकट करणार आहे. तरुण हे देशाचे भवितव्य आहेत. ते बळकट असतील तर देश भक्कम होईल. तरुणांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेस कटीबद्द आहे”, असे त्यांनी ट्वीटच्या माध्यामातून सांगितले.