Lok sabha Election 2024 : ‘जेव्हा सरकार बदलेल…’; 1800 कोटींच्या IT नोटीसवर राहुल गांधींनी दिली अ‍ॅक्शनची ‘गॅरंटी’

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून राजकारण तापले आहे. देशभरात ‘इंडिया’ आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेच केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकार तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.

आयकर विभागने पाठवलेल्या नोटीसला काँग्रेस नेते Rahul Gandhi यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यांनी ट्वीटरवर (X) पोस्ट शेअर करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. “जेव्हा सरकार बदलेल तेव्हा ‘लोकशाहीची पायमल्ली’ करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. कारवाई अशी होईल की पुन्हा कोणाची हे सर्व करण्याची हिंमत होणार नाही. ही माझी गॅरंटी आहे.” असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपला थेट इशारा दिला आहे.

‘अर्थव्यवस्था आजारी, पण भाजपच्या डॉक्टरांना त्याची पर्वा नाही’; पी चिदंबरम यांनी पाजले कडू डोस

शुक्रवारी (29 मार्च 2024) पत्रकार परिषदेत काँग्रेसने या मुद्द्यावर भाष्य केले. “लोकसभा निवडणुकीपूर्वी आयकर विभागाने पाच वेगवेगळ्या आर्थिक वर्षांच्या कर विवरणातील कथित तफावतींबद्दल 1823.30 कोटी रुपये भरण्याची नोटीस बजावली आहे. तर भाजपवर 4600 कोटी रुपयांचा दंड असूनही आयकर विभागाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे,” असे काँग्रेसने पत्रकार परिषदेत म्हटले.

राहुल गांधी म्हणतात, काँग्रेसकडे रेल्वेचे तिकीट काढायलाही पैसे नाहीत; मोदी सरकारचा लोकशाहीवर दरोडा

“लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘कर दहशतवाद’च्या माध्यमातून विरोधकांवर हल्ला केला जात आहे,” असा आरोप काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला.

“ज्या निकषांच्या आधारावर काँग्रेसला दंड भरण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. त्याच निकषाच्या आधारावर 4600 कोटींहून अधिकची रक्कम भाजपकडे मागितली पाहिजे,” असे म्हणत आयकर विभागाच्या कार्यक्षमतेवर काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी सवाल उपस्तिथ केला आहे.