चेन्नईच्या महिलेला सून म्हणून घरी आणले, घरच्यांच्या विरोध केल्याने ठार मारले

राजस्थानच्या चुरू जिल्ह्यात पोलिसांनी एका महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. या महिलेचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला असून हा मृतदेह पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीसाठी शवागारात ठेवला आहे. हे प्रकरण चुरू जिल्ह्यातील सांडवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे. हा मृतदेह पोलिसांना मंगळवारी मिळाला होता.

तपासादरम्यान पोलिसांना कळाले आहे की उडवाला गावात राहणाऱ्या प्रेमचंदने त्याच्या पत्नीची हत्या केली. प्रेमचंद हा सुमारे 15 वर्षांपूर्वी घरातून चेन्नईला पळून गेला होता. प्रमचंद तिथेच कामाला होता. 2 वर्षांपूर्वी त्याने चेन्नईतल्याच एका महिलेशी लग्न केलं होतं. त्याने याबाबत त्याच्या घरच्यांना काहीही सांगितलं नव्हतं. प्रेमचंद जिथे कामाला होता तिथेच त्याची बायकोही कामाला होती. सुमारे महिनाभरापूर्वी प्रेमचंद गावी परतला होता. सोबत तो त्याच्या बायकोलाही घेऊन आला होता. आपल्या मुलाने आपल्याला न सांगता लग्न केल्याने आणि ही बाब लपवून ठेवल्याने प्रेमचंदचे वडील संतापले होते.

चेन्नईतील बायकोसोबत घरी परतलेल्या प्रेमचंदला घरात घेण्यास त्याच्या वडिलांनी नकार दिला आणि त्याला हाकलून दिले होते. यामुळे प्रेमचंद घराजवळील एका झोपडीत राहात होता. प्रेमचंदच्या झोपडीजवळ त्याच्या वडिलांना दोन दिवसांपूर्वी काहीतरी खणलं असून खड्डा भरल्याच्या खुणा दिसल्या होत्या. त्यांनी प्रेमचंदला याबाबत विचारलं असता त्याने सांगितलं की एक कुत्रा मेला होता आणि त्याला तिथे पुरले आहे. यावर भडकलेल्या वडिलांनी प्रेमचंदला म्हटले की कुत्र्याच्या मृतदेहामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी येईल तो उकरून लांब फेकून दे. यावरून पिता-पुत्रांमध्ये वाद झाला होता.

भांड विकोपाला गेले असता प्रेमचंदने आपण कुत्र्याला पुरले नसून आपल्या बायकोला पुरल्याचे कबूल केले होते. प्रेमचंदच्या घरच्यांनी स्वीकारण्यास नकार दिल्याने त्याची बायको निराश झाली होती. ती प्रेमचंदच्या मागे चेन्नईला परत जाण्याचा सतत भुणभुण करत होती. याचा राग आल्याने प्रेमचंदने त्याच्या बायकोचा गळा आवळून खून केला आणि रात्री शेतात पुरून टाकले.