माजी मंत्री व शेकाप नेत्या मीनाक्षी पाटील यांचे निधन

महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री व शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या मीनाक्षी पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. शुक्रवारी दुपारी दोन वाजता पेझारी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

मीनाक्षी पाटील यांचा जन्म 1947 साली झाला होता. मीनाक्षी पाटील यांनी 1995 ते 1999, 1999 ते 2004 आणि 2009 ते 2014 असे तीन वेळा अलिबाग विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्र राज्याच्या मत्स्यमंत्री विभागाच्या राज्यमंत्री म्हणूनही काही काळ त्यांनी कारभार पाहिला.

मीनाक्षी पाटील या माजी विरोधी पक्षनेते तथा ज्येष्ठ विधिज्ञ दत्ता पाटील यांचे बंधू व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रभाकर पाटील यांच्या कन्या होत्या. शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी होत्या. तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या.