जमिनीचा ताबा सोडण्यासाठी मागितली पाच कोटींची खंडणी; मिंधे गटाच्या महेश गायकवाडचा आणखी एक कारनामा

बांधकाम व्यावसायिकाच्या जमिनीवरील हक्क सोडण्यासाठी पाच कोटींची खंडणी मागणाऱ्या महेश गायकवाड याच्या विरोधात हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मिंधे गटाचे वादग्रस्त महेश गायकवाड याचा आणखीन एक प्रताप समोर आला असून ज त्यांच्यासह मुका फुलोरे, रोहिदास फुलोरे, गणेश फुलोरे, शेवंतीबाई फुलोरे यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नवी मुंबई येथील बांधकाम व्यावसायिक सद्रुद्दीन बशर खान यांनी श्रीमलंगवाडीत 27 एकर जमीन खरेदी केली होती. आरोपी महेश गायकवाड आणि त्याच्या साथीदाराने ही वहिवाटीची असल्याचा सांगत या जमिनीवर कोणी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा फलक लावला होता. जमीन मालक खान यांनी बेकायदा फलक काढण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोध करत आम्हाला तुमच्या जमिनीतील अर्धी जमीन द्या, अशी मागणी गायकवाड याने खान यांच्याकडे केली.

दुसऱ्या महिन्यांत दुसरा गुन्हा
नोव्हेंबर 2023 रोजी जमीन पाहण्यासाठी सद्रुद्दीन खान आले असता त्यावेळी त्यांच्या मालकी हक्काच्या 27 एकर जमिनीवर कब्जा केल्याचे निदर्शनास आल्यानंतर जमीन मालकाने थेट हिललाईन पोलीस ठाणे गाठत जमीन बळकावणे आणि खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.