मिंध्यांच्या बेकायदेशीर कंटेनर कार्यालयांची अखेर उचलबांगडी; मीरा-भाईंदर पालिकेची कारवाई

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच मीरा-भाईंदर महापालिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मिंधे गटाने शहरात विविध ठिकाणी सुरू केलेल्या बेकायदा कंटेनर कार्यालयांची अखेर महापालिकेने उचलबांगडी केली आहे. क्रेनच्या सहाय्याने ही कार्यालये हटवण्यात आली. यावेळी कोणतीही हुल्लडबाजी होऊ नये याकरिता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पालिकेच्या या दणक्याने मिंध्यांच्या बगलबच्च्यांना सणसणीत चपराक बसली आहे.

मीरा-भाईंदर शहरात रस्त्यावर मनमानीपणे १५ ठिकाणी मिंधे गटाने कंटेनर थाटून आपली कार्यालये सुरू केली होती. त्यामुळे रहदारीला त्रास तर झालाच, पण उच्च न्यायालयाच्या आदेशाचेदेखील उल्लंघन करण्यात आले. शहरातील गोडदेव, गोल्डन नेस्ट, नवघर आणि रामदेव पार्क अशा भागात फुटपाथवर कंटेनर बसवून त्याला कार्यालयाचे स्वरूप दिले होते. काही दिवसांपूर्वी मिंधे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते त्याचे उद्घाटनदेखील करण्यात आले. मीरा- भाईंदरमध्ये अशा प्रकारची कंटेनर कार्यालये बेकायदेशीरपणे सुरू केल्याचे वृत्त दैनिक ‘सामना’ने प्रसिद्ध केले होते.

मिंध्यांनी थाटलेले बेकायदेशीर कंटेनर कार्यालये त्वरित हटवा, अन्यथा आम्हीही आमची कार्यालये सुरू करू, असा इशारा विरोधकांनी दिला होता. शिवसेनेसह काँग्रेस, मनसेनेदेखील या कार्यालयांना विरोध केला. त्यानंतर प्रशासन जागे झाले आणि महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांनी नोटिसा बजावल्या. तरीही मिंध्यांनी ही कार्यालये हटवली नाहीत. आज अखेर आचारसंहितेचा दणका बसताच महापालिकेने गोल्डन नेस्ट, इंद्रलोक, केबीन रोड, नवघर येथील कंटेनर कार्यालये हटवली. हे सर्व कंटेनर मीरा- भाईंदर पालिकेच्या आवारात ठेवण्यात आले आहेत.

कारवाई सुरूच राहणार
मिंध्यांनी शहरात थाटलेली बेकायदा कंटेनर कार्यालये हटवण्यास आजपासून सुरुवात झाली. ही कारवाई उद्यादेखील सुरूच राहणार असून हे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. या कार्यालयांमध्ये वीजदेखील चोरून घेण्यात आली होती. मात्र अदानी कंपनीच्या दक्षता पथकाने त्यांचे कनेक्शनच कापून टाकले.