पंकजा मुंडे यांचा ताफा रोखला, पोलिसांशी धुमश्चक्री; केजमध्ये मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला

बीड मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना आज केजमध्ये मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. श्रीक्षेत्र तुकोबाराय पावनधाम येथे हरिनाम सप्ताहाला भेट देण्यासाठी जात असताना मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवून ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा दिल्या. पंकजा यांना गावात जाण्यास विरोध करण्यात आला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या वेळी मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याने तणाव वाढला. संतप्त आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली. लाठीमारात काही आंदोलक जखमी झाले आहेत.  

केज तालुक्यातील औरंगपूर येथील पावनधाम येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाला भेट देण्यासाठी पंकजा मुंडे यांचा ताफा आला. मात्र मराठा आंदोलकांनी मुंडे यांच्या ताफ्याचा रस्ता अडवला. ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा सुरू झाल्या. पंकजा मुंडे यांनी आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलक कुणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. पंकजा मुंडे यांना गावात जाण्यास आंदोलकांनी विरोध केला. गोंधळ वाढल्याने पोलिसांनी लाठीमार करून जमाव पांगवला आणि संरक्षणात पंकजा मुंडे यांची गाडी गर्दीतून बाहेर काढली.

पंकजा मुंडे प्रचारासाठी जात असताना त्यांना मराठा समाजाच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपूर्वीच साक्षाळपिंप्री येथे मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंना काळे झेंडे दाखवले होते. या आंदोलकांवर गुन्हे दाखल कsले होते.

लाठीमारात 25 जण जखमी झाल्याचा आरोप

पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात वीस-पंचेवीस जण जखमी झाले आहेत. त्यातील चार-पाच जण गंभीर जखमी असून लाठीहल्ला करणाऱया पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केज तालुका सकल मराठा समाजाने केली आहे.