पाथर्डीला वादळी वाऱ्याने झोडपले, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

पाथर्डी तालुक्याला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तालुक्यातील गावांना चांगलेच झोडपले.शुक्रवारी सायंकाळी पावणे चार वाजण्याच्या सुमारास पाथर्डी शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला. तिसगाव शिवारात वादळी वाऱ्यासह पावसाने चांगले झोडपले. झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे काही काळ वाहतुकीवर मोठा परिणाम होऊन वाहतूक विस्कळीत झाली. जोराचा वारा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेली काही झाडे व फांद्या रस्त्यावर पडल्याने वाहतुक बंद झाली होती. तिसगाव ते श्रीक्षेत्र मढी या रस्त्यावर झाडे रस्त्यावर पाडल्याने काही काळ वाहतूक बंद झाली होती त्यामुळे मढी येथील यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय झालेली. याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळताच त्यांनी त्यांचा पोलीस फाटा घेऊन मढी तिसगाव रस्त्यावरील पडलेली झाडे हटवली व रस्ता सुरळीत केला.वादळी वाऱ्यामुळे आणि झालेल्या पावसाने अनेक आंब्याच्या झाडाचा मोहर तसेच कैऱ्या गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असून पाण्यासाठी नागरिकांची वणवण सुरू आहे त्यात आता शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाबरोबर वादळी वाऱ्याने अजून एक संकट आले असून शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान यामुळे झाले आहे.

पाथर्डी शहरात सुमारे अर्धा तास होऊन अधिक मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने अनेक रस्त्यांवर पाण्याचे डपके साचले होते. आज सकाळपासूनच उन्हाने नागरिक हैराण झाले होते.दुपारनंतर उष्णतेची तीव्रता वाढवून सायंकाळी पाऊस पडल्यानंतर वातावरणात गारवा निर्माण होऊन उन्हाळ्याची तीव्रता कमी झाल्याने नागरिकांना थोडा का होईना उष्णतेच्या गरम वातावरणातून सुटका मिळाली.गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात उष्णतेची चांगली लाट पसरल्याने नागरिक भर उन्हात बाहेर पडणे मुश्किल झाले होते. गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने तालुक्यातील सुसरे येथील दोन घरांचे किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले आहेत. सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर पुन्हा एकदा पाथर्डी शहरात पावसाच्या हलक्या सरीसह वारा सुटला होता. पाथर्डी शहर, तिसगाव,करंजी,माणिकदौंडी, टाकळी मानूर, खरवंडी या परिसरात मध्यम तर काही भागात रिमझिम पाऊस पडला आहे.