‘X’ अचानक PizzaHut वर बहिष्कार घालण्याचा ट्रेंड सुरू का झाला ?

‘X’ (वर पूर्वीचे ट्विटर) शनिवारी अचानक बॉयकॉट पिझ्झाहट (#BoycottPizzaHut) असा हॅशटॅग ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. ट्रेंड सुरू झाल्यानंतर अनेकांशी या ट्रेंडशी काहीही संबंध नसताना आपले संदेश, व्हिडीओ, फोटो ट्रेंडमध्ये आणण्यासाठी हा हॅशटॅग वापरण्यास सुरुवात केली. यामुळे हा हॅशटॅग नेमका कशासाठी वापरला जात आहे हे कळणं कठीण जात होतं. या हॅशटॅगचा संबंध इस्रायल आणि हमास युद्धाशी असल्याचं कळाल्यानंतर या हॅशटॅगबद्दलची लोकांची उत्सुकता आणखीनच वाढली होती.

पिझ्झाहटने इस्रायलच्या सैनिकी तळांवर निशुल्क पिझ्झा पोहोचवला. याचे फोटो X वर प्रसिद्ध झाल्यानंतर हमास आणि पॅलेस्टाईन समर्थकांनी पिझ्झाहटवर बहिष्कार घालण्यासाठी हा हॅशटॅग सुरू केला. हे पाहिल्यानंतर या बहिष्काराच्या विरोधात अनेकांनी बोलण्यास सुरुवात केली. वैयक्तिक स्वार्थासाठी पिझ्झाहटवर बहिष्कार घालणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. या बहिष्काराला टक्कर देण्यासाठी #SupportPizzaHut हा हॅशटॅग सुरू करण्यात आला.

पिझ्झाहटविरोधात पॅलस्टाईनवासीयांचा राग उफाळून येण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही पिझ्झाहटवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करण्यात आले होते. पिझ्झाहटच्या एका जाहिरातीमुळे पॅलेस्टाईनवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या. ही जाहिरात हटविण्याची मागणी करण्यात आली होती. ही जाहिरात पॅलेस्टाईनमध्ये उपोषण करणाऱ्यांची खिल्ली उडवणारी जाहिरात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.