‘माय नेम इज खान’ला विरोध; शिवसैनिकांची निर्दोष मुक्तता

शाहरुखच्या ‘माय नेम इज खान’ चित्रपटाविरोधातील आंदोलन प्रकरणात अंधेरी न्यायालयाने शिवसैनिकांची निर्दोष सुटका केली. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे नसल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने पाचही शिवसैनिकांना निर्दोष मुक्त केले. दंडाधिकारी एच. ए. हश्मी यांनी दिलेल्या या निकालामुळे शिवसैनिकांना दिलासा मिळाला.

फेब्रुवारी 2010 मध्ये शाहरुख खानने आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना सहभागी करून घेण्यास समर्थन केले होते. त्याच्या या भूमिकेचा निषेध म्हणून ‘माय नेम इज खान’ चित्रपटाविरुद्ध शिवसैनिकांनी विलेपार्ले पूर्व परिसरात तीव्र आंदोलन केले होते. यावेळी आंदोलक शिवसैनिकांनी बेस्ट बसची तोडफोड केल्याचा आरोप होता. याप्रकरणी तत्कालीन उपशाखाप्रमुख स्व. सुधीर मोरे, संतोष मोरे, संजय शहाणे, श्रीकांत राणे आणि जयेंद्र नामे यांना 10 फेब्रुवारी 2010 रोजी अटक केली होती. त्यांच्याविरोधात 14 वर्षे अंधेरीच्या दंडाधिकारी न्यायालयात खटला चालला. तथापि, या प्रकरणात सबळ पुरावे नाहीत, असे निरीक्षण नोंदवत दंडाधिकाऱयांनी पाचही शिवसैनिकांची निर्दोष सुटका केली. खटल्यात शिवसैनिकांची ठोस बाजू मांडण्यासाठी शिवसेना नेते, विभागप्रमुख, आमदार डॉ. अनिल परब, ऍड. सुधाकर (बाळा) सावंत, भाई महाडिक व विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांचे विशेष सहकार्य लाभले.