रामटेकमधून रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद

लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना काँग्रेसला धक्का बसला आहे. कारण, काँग्रेसच्या रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे. कारण बर्वे यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात पडताळणी समितीने रद्द केलं आहे. रामटेक हा मतदारसंघ अनुसूचित जाती-जमातींसाठी राखीव असल्याने रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला आहे.

रश्मी बर्वे यांनी 2020 वडिलांच्या शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र बनवले होते. मात्र हे जात वैधता प्रमाणपत्र बनवताना देण्यात आलेले वडिलांचे शैक्षणिक कागदपत्र खोटे असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. राज्य सरकारने 22 मार्चला याप्रकरणी आदेश काढत चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी जिल्हा जात पडताळणी समितीचे अधिकारी गेल्या तीन-चार दिवसांपासून रश्मी बर्वे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता.

अखेर गुरुवारी सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी जिल्हा जात पडताळणी समितीच्या अधिकाऱ्यांनी रश्मी बर्वे यांच्या घरावर एक नोटीस चिटकवली आणि 10 वाजेपर्यंत म्हणणे मांडण्याची संधी दिली होती. त्यानंतरही रश्मी बर्वे जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर हजर राहिल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने निर्णय घेत रश्मी बर्वे यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द ठरवले होते.

रश्मी बर्वे यांच्याऐवजी आता श्यामकुमार बर्वे हे आता या जागेवर उमेदवार असतील असा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.