प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या राजपथावर अवतरणार शिवरायांची जीवनकथा

देशाच्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी धन्य शिवराय… धन्य महाराष्ट्र या गीताची धून नवी दिल्लीच्या राजपथावर वाजणार आहे. प्रजासत्ताक दिनी होणाऱया पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीने ‘लोकशाहीचे प्रेरणास्थान- छत्रपती शिवाजी महाराज’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर होणार आहे. या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनकथा त्यांच्या बालपणापासून ते  राज्याभिषेकापर्यंत दाखवण्यात येणार आहे.

प्रजासत्ताक दिनी चित्ररथ पथसंचलनात 26 राज्ये व सात केंद्रशासित प्रदेश यांना ‘विकसित भारत’ व ‘भारत लोकशाहीची जननी’ या दोन संकल्पनांवर आपल्या चित्ररथाच्या संकल्पना सादर करण्यास केंद्र शासनाने कळविले होते. त्यानुसार महाराष्ट्राने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त, ‘लोकशाहीचे प्रेरणास्थान ः छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयाचे सादरीकरण केले होते.

यंदा देशाच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनी 30 चित्ररथ पथसंचलनात सहभागी होणार आहेत. विविध चाचण्यांनंतर महाराष्ट्रासह देशातील 16 राज्यांच्या चित्ररथांची निवड या गौरवपूर्ण कार्यक्रमासाठी झाली आहे. राष्ट्रीय रंगशाला दिल्ली केंट या परिसरात शुभ ऍड नागपूर या संस्थेमार्फत चित्ररथाची बांधणी करण्यात येत आहे. तर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील 16 कलाकारांच्या चमूच्या माध्यमातून चित्ररथाच्या सोबतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

असा असणार चित्ररथ…
चित्ररथाच्या दर्शनीय भागात दोन महिला योद्धा दांडपट्टा फिरवतांना दिसतात व राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना राजकारण, समानता, न्याय आणि समता यांचे धडे देताना दिसत आहेत.  त्यांच्या मागे न्यायाचे प्रतीक असलेले तराजू दाखवण्यात आले आहे. महाराजांची आज्ञापत्रे आणि काही राजेशाही चिन्हे देखील चित्ररथावर दाखवण्यात आली आहेत. मध्यभागी अष्टप्रधान मंडळ दरबार दाखवण्यात आला आहे. मागील भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, राजमाता जिजाऊ आणि इतर दरबारी यांच्या दृश्यांसह छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दाखवण्यात आला आहे. शेवटच्या भागात किल्ला आणि राजमुद्रांची प्रतिकृती दाखवण्यात आली आहे.