सामना अग्रलेख – दिल्लीचे गावजेवण

युक्रेनवरील हल्ला हा ‘जी-20’तील चिंतेचा विषय असेल, तर भारतातील लोकशाही व स्वातंत्र्याची गळचेपी हादेखील चिंतेचा विषय ठरला पाहिजे. नाहीतर दिल्लीत जग आले, मोदींनी पंगत बसवली, पण त्या पंगतीत भारताच्या लोकशाहीचे ताट रिकामे राहिले, असेच म्हणावे लागेल. ‘जी-20’ दिल्लीत यशस्वी होणे ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. यजमान मोदी यांनी पाहुण्यांचे आगत स्वागत छान केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेही पंगतीत सामील झाले. पंगत संपल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘व्वा! व्वा! मोदींनी जग जिंकले!’’ पण जालन्यात मराठा समाजासाठी प्राण पणास लावणाऱ्या मनोज जरांगे-पाटलांच्या पोटात पंधरा दिवसांपासून अन्नाचा कण नाही. मोदींनी जग जिंकून काय फायदा?

‘जी-20’ परिषदेची यशस्वी सांगता झाल्याचे सरकारतर्फे जाहीर करण्यात आले. भारताकडे नोव्हेंबर 2023 पर्यंत ‘जी-20’चे अध्यक्षपद राहील. त्यानंतर ‘जी-20’चे यजमानपद ब्राझीलकडे जाईल. भारतात सोहळा होण्याआधी हा मान इंडोनेशियाकडे होता. म्हणजे ‘जी- 20’चा फिरता चषक हा या देशातून त्या देशात फिरत असतो. पंतप्रधानांनी सर्व परदेशी पाहुण्यांना रात्रीचे जेवण दिले. त्या ‘डिनर’साठी काँग्रेस अध्यक्ष तसेच विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे सोडून सगळ्यांना बोलावले. एक प्रकारे ते भव्य अशा गावजेवणाचेच निमंत्रण होते. राज्यांचे मुख्यमंत्री त्यात सहभागी होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जागतिक जेवणावळीचे निमंत्रित होते. जेवण झाल्यावर शिंदे यांनी ढेकर दिला की, ‘‘पंतप्रधान मोदींनी जग जिंकले.’’ शिंदे म्हणतात त्याप्रमाणे ‘जी-20’च्या निमित्ताने मोदी यांनी जग जिंकले असेल तर आनंदच आहे. भारतासाठी ही गौरवाचीच बाब आहे, पण मोदी जग जिंकत असताना देशात मणिपूर आजही पेटलेले आहे व मणिपूरच्या जनतेची मने मोदी जिंकू शकलेले नाहीत. मोदींनी जग जिंकले, पण चीनने लडाखची जमीन गिळली आहे व त्या जमिनीवरून मोदी चिन्यांना मागे ढकलू शकलेले नाहीत. तेव्हा जग जिंकत असताना आपल्या देशात काय जळते ते आधी पाहणे गरजेचे आहे. पुन्हा जिंकलेल्या जगात भारत आहे की नाही? हा प्रश्नही आहेच. आज जग भारताने जिंकले. पुढच्या ‘जी-20’च्या वेळी यजमान असलेला ब्राझील जग जिंकेल. जग जिंकण्याचा चषक असाच फिरत राहील व जग जिंकण्याची अशी संधी नेपाळ, बांगलादेश, म्यानमार, सिंगापूरलाही मिळेल. अर्थात ‘जी-20’चे आयोजन नेत्रदीपक व नीटनेटके झाले. रशियाचे अध्यक्ष पुतीन व चीनचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीत आले नाहीत, पण त्यांचे प्रतिनिधी संमेलनात सामील झाले.

‘जी-20’ परिषदेत

मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘दिल्ली घोषणापत्र’ जारी झाले व त्या घोषणापत्रावर सगळय़ांची सहमती झाली. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाचा सहभाग असलेल्या बहुतेक सर्व जागतिक परिषदांमध्ये संयुक्त निवेदनावर एकमत झाले नव्हते, पण भारतातील परिषदेत रशियाचा सहभाग असूनही घोषणापत्र एकमताने मंजूर झाले. दिल्लीच्या घोषणापत्रात युक्रेन युद्धात झालेल्या मानवी हानीबद्दल आणि युद्धामुळे जगावर होणाऱया दुष्परिणामांबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली, पण अशाच प्रकारची मनुष्यहानी स्वदेशात मणिपुरात सुरू आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत, पाचशेच्या आसपास लोक मरण पावले आहेत. युक्रेनच्या मनुष्यहानीइतकीच मणिपूरची मनुष्यहानी महत्त्वाची आहे. लोकशाही हा ‘जी-20’चा आत्मा आहे. महात्मा गांधी हे लोकशाहीचे जनक आहेत. ‘जी-20’ परिषदेसाठी भारतात आलेल्या राष्ट्रप्रमुखांनी पंतप्रधान मोदींसमवेत राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. हा भाजपवर व त्यांच्या सरकारवर काळाने घेतलेला सूड आहे. गेल्या दहा वर्षांत गांधी व गांधी विचार मारण्याचा प्रयत्न झाला, पण जगाला दाखविण्यासाठी का होईना, पंतप्रधान मोदी यांना गांधींसमोर झुकावे लागले. कारण जगाने गांधी विचार स्वीकारला आहे. ‘जी-20’चे यश असे की, अनेक आव्हानांना सामोरे जाण्याचा नवा मार्ग या परिषदेने सर्वांना दाखविला. श्रीमंत राष्ट्र, पाश्चिमात्यांना रोखण्यासाठी ‘जी-20’चे योगदान महत्त्वाचे व ते दिल्लीच्या घोषणापत्रात दिसले. ‘जी-20’चे ढोल थंडावतील. त्यात राजकीय प्रचाराचा भाग जास्त होता. या निमित्ताने ‘इंडिया’चे भारत करण्याचा प्रयत्न झाला. लोकशाही मान्य असल्याचे हे लक्षण नाही. भारत

लोकशाहीची जननी

असलेल्या पुस्तिकेचे वाटप या सोहळय़ात झाले. त्या पुस्तिकेत ‘राज्यकारभारात जनतेची मते विचारात घेणे हे भारतात पूर्वापार काळापासून चालत आले आहे. भारतीय परंपरेनुसार लोकशाही म्हणजे निवडीचे स्वातंत्र्य, विविध कल्पना मांडण्याचे स्वातंत्र्य. जनकल्याणासाठी सरकार व सर्वसमावेशी समाज असा लोकशाहीचा अर्थ होतो. तसेच भारतीय लोकशाहीत सुसंवादाच्या मूल्यांवर भर दिला जातो,’ असे म्हटले आहे. मात्र प्रत्यक्षात भारतात या सर्व गोष्टींचे मूल्य आज शिल्लक आहे काय? जनतेच्या मतांना कोणी विचारत नाही. जम्मू-कश्मीरसारख्या राज्यात पाच वर्षांपासून निवडणुका नाहीत. मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका टाळल्या जात आहेत. त्यामुळे लोकशाही म्हणजे निवडीचे स्वातंत्र्य या ओळीचे महत्त्वच उरलेले नाही. निवडणूक आयोगापासून न्यायव्यवस्थेपर्यंत हव्या त्या माणसांच्या नेमणुका करणे व त्यांच्या माध्यमातून राज्य करणे हे काही लोकशाहीतील संवादाचे लक्षण नाही. युक्रेनवरील हल्ला हा ‘जी-20’तील चिंतेचा विषय असेल, तर भारतातील लोकशाही व स्वातंत्र्याची गळचेपी हादेखील चिंतेचा विषय ठरला पाहिजे. नाहीतर दिल्लीत जग आले, मोदींनी पंगत बसवली, पण त्या पंगतीत भारताच्या लोकशाहीचे ताट रिकामे राहिले, असेच म्हणावे लागेल. ‘जी-20’ दिल्लीत यशस्वी होणे ही नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. अंगत-पंगत नक्कीच छान जमली. यजमान मोदी यांनी पाहुण्यांचे आगत स्वागत छान केले. भारत मंडपमही दिमाखदार होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेही पंगतीत सामील झाले. पंगत संपल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘व्वा! व्वा! मोदींनी जग जिंकले!’’ पण जालन्यात मराठा समाजासाठी प्राण पणास लावणाऱया मनोज जरांगे-पाटलांच्या पोटात पंधरा दिवसांपासून अन्नाचा कण नाही. मोदींनी जग जिंकून काय फायदा?