मोदी-फडणवीस सरकार आल्यापासून जवान आणि शेतकऱ्यांचे प्रचंड हाल; संजय राऊत यांचा हल्लाबोल

कधीकाळी आपण या देशामध्ये ‘जय जवान जय किसान’ ही घोषणा देत होतो. त्यावेळी आमची छाती अभिमानाने फुलून येत होती. या देशाचे रक्षण करण्याची, देश वाढवण्याची, देश घडवण्याची जबाबदारी या देशातल्या शेतकऱ्यांवर आहे, सीमेवर लढणाऱ्या जवानांवर आहे. पण आज दुर्देवाने गेल्या दहा वर्षात या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचे सरकार आल्यापासून ‘जवान’ आणि ‘किसान’ यांचे हाल कुत्राही खायला तयार नाही असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज हिंगोली येथील उमरखेड येथे जनसंवाद दौरा होता. यावेळी संजय राऊत जाहीर सभेत बोलताना म्हणाले, ‘आकाशातून सूर्य आग ओकतोय, तळपतोय, घामाच्या धारा वाहताहेत तरी आपण इतक्या मोठ्या संख्येने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी जमलेले आहात. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी जे वादळ निर्माण केले आहे, झंझावात निर्माण केला आहे, संघर्षयात्रा निर्माण केलेली आहे आपण त्या संघर्षातले महत्वाचे घटक आहात’. उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि कष्टकऱ्यांसाठी लढताहेत. हा महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या घामातून निर्माण झालेला आहे आणि आज तोच शेतकरी, कष्टकरी संकटात असताना आपल्यासाठी उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना आपण पाहताय. पुढे संजय राऊत म्हणाले, आपल्या राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शेतकऱ्यांच्या संकटाबाबत लेखाजोखा मांडला. कधीकाळी आपण या देशामध्ये जय जवान जय किसान ही घोषणा देत होतो त्यावेळी आमची छाती अभिमानाने फुलून येत होती. या देशाचे रक्षण करण्याची, देश वाढवण्याची, देश घडवण्याची जबाबदारी या देशातल्या शेतकऱ्यांवर आहे, सीमेवर लढणाऱ्या जवानांवर आहे. पण आज दुर्देवाने गेल्या दहा वर्षात या देशामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून आणि महाराष्ट्रात फडणवीसांचे सरकार आल्यापासून जवान आणि किसान यांचे हाल कुत्राही खायला तयार नाही’.

2014 साली नरेंद्र मोदी यांनी एक घोषणा केली होती. ती घोषणा अशी होती की, मी सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांचे उत्पन्न मी दुप्पट करेन. दुप्पट सोडा जे तुम्हाला मिळत होते तेही कमी झाले. आम्हाला अच्छे दिन नकोत, 2014च्या आधी जे आमचे चांगले दिवस होते ते आम्हाला परत द्या, आम्ही सुखाने जगू . सत्तेत आल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना, देशाला, महाराष्ट्राला लुटलं आहे. 2 कोटी रोजगार देणार होते. पण 100 जणांना सुद्धा मराठवाड्यात रोजगार मिळाला नाही, मग रोजगार कोणाला मिळाला? तर मुठभर दहा लोकांना, अमित शहाच्या मुलाला त्या जय शहाला आणि कोणाला मिळाला रोजगार एकनाथ शिंदेला, अजित पवारला, तुम्हाला मिळाला ? रोजगार कोणाला मिळाला, पैसा कोणाला मिळाला 40 गद्दार आमदारांना, त्यांना 50- 50 कोटी रुपये द्यायला तुमच्याकडे पैसे आहेत आणि शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. शिवसेनेचे खासदार 100 – 100 कोटीला विकत घेता आणि शेतकऱ्याच्या मालाला, ऊसाला, सोयाबीनला, कापसाला भाव द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. ही महाराष्ट्राची अवस्था. 2014 साली गॅस सिलेंडर हे 400 रुपयाला मिळत होते आदा अकराशे -बाराशे रुपये आपल्याला सिलेंडरला द्यावे लागतात. हे तुमचे अच्छे दिन आम्हाला नकोत. आम्हाला 2014चे 400 रुपये सिलेंडर देणारे अच्छे दिन हवे आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी यावेळी केला.

या महाराष्ट्रामध्ये एक दळभद्री घटनाबाह्य सरकार सत्येवर बसलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्या सरकारच्या कंबरेत लाथ घातलेली आहे आणि चालते व्हा सांगितलेले आहे, तरी नरेंद्र मोदी, अमित शहा हे सरकार महाराष्ट्राच्या उरावर बसवलेले आहे. आमच्या छाताडावर बसवलेले आहे. हे बेमानांचे सरकार, गद्दारांचे सरकार हे आपल्याला घालवून देण्यासाठी उद्धव ठाकरे हे पायाला भिंगरी लावून फिरतायत आणि मला खात्री आहे की, या हिंगोलीचा खासदार गद्दार झाला, त्या खासदाराला घरी बसवताना आपण विचार करायला पाहिजे की शिवसेना ही चार अक्षरे आपल्या पाठिशी नसती. तर हे कुणी आमदार, खासदार होऊ शकले असते का? मंत्री झाले असते का? पण आपण त्यांना केले. शिवसेनेने त्यांना केले आणि 50 -100 खोक्यासाठी ते पळून गेले त्यांनी गद्दारी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीला त्यांनी कलंक लावला. बेईमानीचा कलंक लावला हे विसरता येणार नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं राज्य आणायचे, शिवशाहीचं राज्य आणायचे आणि आपण ज्यांचा उल्लेख माजी मुख्यमंत्री नाहीच मुख्यमंत्रीही नाही उद्धव ठाकरे कधीच माजी होऊ शकत नाहीत. ते सदैव आपल्या राज्याचे, 11 कोटी जनतेचे, राज्याचे कुटुंबप्रमुख आहेत आणि राहतील, असं राऊत म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याची सूत्रे द्यायची आहेत. आपल्या कुटुंबाची प्रथा असते, कुटुंबात कर्ता पुरूष असतो, कुटुंबाचा प्रमुख असतो आणि त्याचे आपण ऐकतो. कारण तो आपली काळजी घेतो. मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी सर्वांची काळजी घेतली. आपले प्राण वाचवले आपल्या मुलाबाळांचे रक्षण केले. संपूर्ण देशामध्ये प्रेतांचे खच पडत होते, स्मशानात जागा नव्हती. त्या योगी आदित्यनाथाच्या राज्यात गंगेमध्ये हजारो प्रेतं करोना काळात बेवारसपणे फेकली जात होती. त्या काळामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरुन राज्यातील प्रत्येक कुटुंबाची काळजी घेत होते. म्हणून ते आपले कुटुंबप्रमुख झाले आणि राहतील. अशा कुटुंबप्रमुखाच्या मागे आपल्याला ठामपणे उभे राहायचे आहे आणि ज्या भगव्या झेंड्याखाली आपण बसलेले आहात. हा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या विधानसभेत, दिल्लीच्या तख्तापर्यंत आपल्याला घेऊन जायचेय, असं आवाहन संजय राऊत यांनी यावेळी केलं.