मतदानावरील बहिष्काराच्या अस्त्राने प्रशासनाची धावपळ; मेळघाट, परभणी, वाशीम, नांदेडमध्ये गैरसोयीविरोधात ग्रामस्थ एकवटले

लोकशाही उत्सवाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात मोठय़ा उत्साहात मतदान होत असताना राज्यात चार जिल्ह्यांमध्ये सुविधांअभावी होणाऱ्या गैरसोयींमुळे गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला. मेळघाटमधील चार गावे, परभणी, वाशीम आणि नांदेडमधील गावांमधील ग्रामस्थांची मने वळवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू होते.

आदिवासींसाठी रस्ता, पाणी, वीज नाही
मेळघाटातील रंगूबेली, धोकडा, पुंड आणि खामदा या गावांमध्ये मतदान केंद्रांवर गावातील एकही रहिवासी फिरकला नाही. मेळघाटात अतिदुर्गम भागात वसलेल्या या चारही गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. या गावात वाहनदेखील पोहोचू शकत नाही. वीजपुरवठा आणि पिण्याचे पाणीदेखील नाही. यासह आरोग्य सेवादेखील या गावांमध्ये उपलब्ध नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तक्रारी आणि निवेदनांची दखल न घेतल्यामुळे आम्ही मतदान करणार नाही, असे गावकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ग्रामपंचायतीचा दर्जा द्या!
वाशीम जिल्ह्यातील पांघरी गावाला ग्रामपंचायतीचा दर्जा मिळावा आणि गावाचा विकास व्हावा यासाठी गावकऱ्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला.

किनवटमध्ये आदिवासींना पायाभूत सुविधा नाहीत
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आदिवासीबहुल भाग असलेल्या पांगरपहाड येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. दुपारी 12 वाजेपर्यंत एकाही मतदाराने मतदानाचा हक्क बजावला नाही. पूल, रस्ते, वाहतूक अशा पायाभूत सुविधा नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी बहिष्कार टाकल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती. गावात 309 मतदार संख्या आहे.

अतिक्रमण हटवण्याची मागणी!
परभणी जिल्ह्यातील बलसा खुर्द येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. प्रशासनाकडून काही लोकांना पुनर्वसन करून जागा देण्यात आली होती, परंतु काही गावगुंडांकडून त्यांच्या जागेवर अतिक्रमण केले. यावरून संपूर्ण गावकरी एकवटले असून त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सकाळपासून गावकऱ्यांशी संवाद साधला. संध्याकाळी गावकऱयांची मनधरणी करण्यात त्यांना यश आले.