श्रीराम अन् योग

>> सीए अभिजित कुळकर्णी – योगशिक्षक, भारतीय योग मंदिर

प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी उत्तम योगावर झाली. हा दिवस किंवा ही घटना केवळ धार्मिक नाही किंवा केवळ भक्तिरसात डुबलेली नाही, तर ते हिंदुस्थानच्या राष्ट्रीय अभिमानाच्या आणि संस्कृतीच्या पुनरुत्थानाचे प्रतीक आहे.

श्रीराम आणि योगाभ्यास असा आपला आजचा विषय आहे. रामायणामध्ये असे अनेक उल्लेख आढळतात की, प्रभू श्रीराम हे नित्यनियमाने संध्यावंदना करीत असत आणि संध्यावंदनामध्ये अनुलोम-विलोम प्राणायाम हा तीनवेळा केला जातो. अर्थातच श्रीराम प्राणायामाचा अभ्यास करीत असत आणि प्राणायामाने शुद्ध झालेल्या प्राणांची प्रतिष्ठा ही अयोध्येत सोमवारी झाली.

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।
पुढे वैखरी राम आधी वदावा?

सकाळी सर्वप्रथम श्रीरामांचे ध्यान करावे आणि दिवसाचा प्रारंभ करावा असा सनातन धर्माचा नेम आहे. योगी ध्यान करताना श्रीरामाच्या सुंदर रूपाचे ध्यान करू शकतात. राम म्हणजे ज्या ठिकाणी आपले चित्त रममाण होते असे दिव्य स्वरूप. या दिव्य स्वरूपाचे वर्णन रामरक्षा स्तोत्रात अतिशय सुंदर शब्दांमध्ये केले. ऋषी बुधकाwशिक म्हणतात,
।अथ ध्यानम् ।
ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्दद्पद्मासनस्थं ।
पीतं वासोवसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामाङ्कारूढसीता मुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं ।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचंद्रम् ।

अशा सुंदर, सात्त्विक, मंगल आणि पवित्र स्वरूपाचे चिंतन केले तर आपण सहजपणे ध्यानावस्थेत जाऊ शकतो.
श्रीरामांचे गुरू वशिष्ठ यांच्या नावाने ‘अध्यात्म रामायण’ आहे. त्याला ‘योगवासिष्ठ’ असेही म्हणतात. रामरक्षेतील श्रीरामांच्या वर्णनात ते पद्मासनात अथवा बद्ध पद्मासनात असल्याचा उल्लेख येतो. रामायण काळातील हा उल्लेख योगाच्या इतिहासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे.

श्रीरामांचे गुरू वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्या नावाने वसिष्ठासन आणि विश्वामित्रासन योगाभ्यासात येतात. हनुमान आणि अंगद या वानरवीरांच्या नावाने हनुमानासन, अंगदासन आणि वीरासन आहेत. सध्या योगाभ्यासाचा एक अंग मानला जातो तो सूर्यनमस्कार हा व्यायाम प्रकारही श्री हनुमंतांनी सुरू केला असे मानले जाते.
सदा सर्वदा प्रीती रामीं धरावी।

अनेक ऋषीमुनींचे किंवा त्यांनी केलेल्या तपश्चर्येचे वर्णन रामायणात आढळते आणि तपश्चर्या हे योगाभ्यासाचे एक अंग आहे. योगाभ्यासाचे आणखी एक अंग आहे ईश्वर प्रणिधान अर्थात ईश्वराचे सतत स्मरण ठेवणे आणि ईश्वरावरील श्रद्धा किंवा भक्ती जागृत होण्यासाठी प्रभू श्रीरामांच्या सुंदर रूपाइतके दुसरे काय बरे श्रेष्ठ साधन असू शकेल?

रामायण हे संपूर्ण भारतवर्षाला एका सूत्रामध्ये बद्ध करते तसेच योगशास्त्रही एकत्र संघटित करते. आसेतुहिमाचल योगाभ्यास हा पतंजलीच्याच नावाने ओळखला जातो आणि रामायण हे आदिकवी वाल्मीकीच्या. योग आणि रामायण ही संपूर्ण देशाला एका संघटनात बांधणारी अंगे आहेत.

www.bymyoga.in