अंबेनळी घाटात टेम्पो दरीत कोसळला; चालक, इंजिनीअरसह  चौघे जखमी

महाबळेश्वरपासून जवळच मेटतळे गावच्या हद्दीत अंबेनळी घाटात टेस्ट ड्राइव्हसाठी निघालेल्या टेम्पोच्या चालकाचा ताबा सुटून सुरक्षाकठडा तोडून टेम्पो खोल दरीत कोसळला. या अपघातात टेम्पोचा चक्काचूर झाला असून चालक आणि एक इंजिनीअर सुदैवाने बचावले. दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना वाचविण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी दोघे जखमी झाले. या अपघातामुळे अंबेनळी घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

टेम्पोचालक देवदत्त वाघ, इंजिनीअर जितेंद्र खाणे अशी जखमींची नावे आहेत. तर बचावासाठी गेलेले सीताराम शिंगरे व सोमनाथ वागदरे हे जखमी झाले आहेत. पुणे येथील टाटा मोटारचे तीन कर्मचारी टेस्ट ड्राइव्हसाठी महाबळेश्वरमार्गे अंबेनळी घाटातून पोलादपूरला निघाले होते. टेम्पोत चालकासह एक इंजिनीअर होता. आज दुपारी टेम्पो  चालकाचा ताबा सुटल्याने टेम्पो सुरक्षा कठडा तोडून   दरीत कोसळला. चालकाला वाचवत असताना टेम्पोने दोन पलटी घेतल्यामुळे बचावासाठी गेलेले स्थानिक तरुण जखमी झाले.