अखेर ‘त्या’ मुलावर झाले अंत्यसंस्कार 

वडाळा येथे दोन महिन्यांपूर्वी हत्या झालेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह अखेर आज पालकांनी ताब्यात घेतला. 25 दिवसांनी पालकांनी त्या मुलावर अंत्यसंस्कार केले, तर मुलाच्या मारेकऱ्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने मोहीम हाती घेतली आहे.

मृत मुलगा हा वडाळा परिसरात त्याच्या कुटुंबीयांसोबत राहत होता. तो एका शाळेत सहावी इयत्तेत शिकत होता. 28 जानेवारीला तो मुलगा घराबाहेर पडला. रात्री तो घरी न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुलगा बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात धाव घेतली. वडाळा टी. टी. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद केला.

पोलीस त्या मुलाचा शोध घेत होते. दरम्यान 4 मार्चला पोलिसांना त्या मुलाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी त्या मुलाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मारेकऱ्याने मुलाची हत्या करून पुरावा नष्ट केला होता. त्यामुळे मुलाच्या पालकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केला होता. जोपर्यंत मारेकरी सापडत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा मुलाच्या कुटुंबीयांनी घेतला. अखेर आज त्या मुलाचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांनी ताब्यात घेतला. आज त्या मुलावर अंत्यसंस्कार करण्यात आले.