राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, मला जाब विचारणारे हे कोण; एकनाथ खडसे यांचा सवाल

लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली नसून वैद्यकीय कारणास्तव मला लांब रहावे लागत आहे. मी शरद पवारांसोबत कायम आहे, मी कुठलाही दगाफटका केला नसून आमदारकीचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; मला जाब विचारणारे डॉ. सतीश पाटील व संजय पवार कोण, असा प्रश्न उपस्थित करीत एकनाथ खडसे यांनी विरोधकांचा पत्रपरिषदेत समाचार घेतला. या वेळी अशोक लाडवंजारी, दीपक फालक व पदाधिकारी उपस्थित होते.

 खडसे म्हणाले की, गेल्या अनेक दिवसांपासून वैद्यकीय कारण असल्याने आपण निवडणूक लढविणार नाही हे सांगत आलो आहे. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाही याबाबत माहिती दिली असताना डॉ. सतिश पाटील म्हणतात की, मी माघार घेतली हे पूर्णतः चुकीचे आहे. डॉ. सतिश पाटील यांनी अभ्यास न करता हे आरोप केले असून त्यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार हे पक्षफुटीनंतर शरद पवारांची साथ सोडून गेले. ते मला विचारणारे कोण, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हेच संजय पवार माझ्या भरवशावर बँकेत विजयी झाले होते. स्वतःच्या घरात विविध पक्षांच्या माध्यमातून त्यांनी पदांची खिरापत वाटली आहे. स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे बघावे वाकून अशी त्यांची अवस्था आहे.

तुतारीच वाजविणार

भाजपाने स्नुषा रक्षाताई खडसे यांना उमेदवारी दिली असली तरी मी पक्षासोबत कायम राहून राष्ट्रवादीची तुतारीच आगामी निवडणुकीत फुंकणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. आपण पक्षासोबत कायम असून शरद पवार यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास असल्याचेही त्यांनी नमूद केले. भाजपाला रामराम केल्यानंतर आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला असून पक्षाशी एकनिष्ठ आहे. माझ्या घरात भाजपाने उमेदवारी दिली असली तरी मी राष्ट्रवादीचाच प्रचार करणार आहे. मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या प्रकरणात अडकविण्याचा प्रकार झाला, मात्र मी सत्तेसाठी कधीही झुकलो नाही आणि झुकणारदेखील नाही असे सांगत  खडसे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.