रखडलेल्या इमारतींमधील रहिवाशांचा मिंधे सरकारविरुद्ध प्रचंड असंतोष

शिवाजी पार्क-दादर- माहीममधील किमान 27 गृहनिर्माण प्रकल्प रखडले असून शेकडो मराठी कुटुंबे विस्थापित झालेली आहेत. रहिवाशांचे कोटय़वधी रुपयांचे भाडे थकले आहे. नव्या हक्काच्या घराच्या प्रतीक्षेत अनेकांनी प्राण सोडले. या रखडलेल्या जुन्या इमारतींचा म्हाडामार्फत पुनर्विकास करण्याची फक्त घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली. या रखडलेल्या इमारतींमधील रहिवाशांमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष असून त्याचा मोठा फटका मिंधे गटाला लोकसभा निवडणुकीत बसणार आहे.

या भागातील अनेक इमारतींचे बांधकाम पंधरा ते वीस वर्षांपासून रखडले आहे. रहिवासी विस्थापित झालेले आहेत. याचा मोठा फटका सत्ताधारी पक्षालाच बसणार आहे

आर. के. बिल्डिंगचा सांगाडा

गोखले रोड व रानडे रोडच्या नाक्यावर आर. के. बिल्डिंग क्रमांक एक व दोन या दोन इमारती दादरच्या राजकीय व सामाजिक स्थित्यंतराच्या साक्षीदार आहेत. या इमारतींमध्ये बहुतांश मराठी कुटुंबे होती. इमारतीच्या विकासकाने या इमारतीचे नामकरण स्वामी समर्थ कृपा असे केले. सध्या नऊ मजल्यापर्यंत या इमारतीचे बांधकाम झाले आहे. 2014 पासून इमारतीचे बांधकाम रखडले आहे. रहिवाशांना अकरा वर्षांपासून भाडेही मिळाले नाही.  या इमारतींमधील 105 कुटुंबे विस्थापित झाली. उपनगरात दूर स्थायिक झालेले रहिवासी दादरमध्ये येऊन मतदान करण्याच्या मनःस्थितीत नाहीत.

जसोदा बिल्डिंग बंद

माटुंग्याच्या सेनापती बापट मार्गावरील जसोदा को-ऑपरेटीव्ह सोसायटी ही इमारत विकासकाने पंधरा मजल्यापर्यंत बांधली. नंतर विकासकाने बांधकाम अर्धवट सोडले. पाच वर्षांपासून इमारतींतील रहिवाशांना भाडे मिळत नाही.

छपरामध्ये रहिवाशांचे वास्तव्य

प्लाझा चित्रपटगृहासमोरील छपरा बिल्डिंगचे बांधकाम गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून रखडले आहे. या इमारतींमधील रहिवासीही विस्थापित झालेले आहेत. घराचे भाडे विकासकाने अनेक वर्षांपासून दिलेले नाही. त्यामुळे पंटाळलेल्या रहिवाशांनी काही खोल्यांचा ताबा घेतला. सध्या अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रहिवासी वास्तव्याला आहेत.

क्लस्टर पुनर्विकास रखडला

शिवसेना भवनच्या आसपासच्या आठ इमारतींचा समूह पुनर्विकास करण्याची महत्त्वाकांक्षी योजना होती. मोहमदी मंझिल, अहमद बिल्डिंग, समाधान बिल्डिंग, बाळकृष्ण सदन. कत्राडा मॅन्शन व शेजारच्या तीन इमारतींचा समूह पुनर्विकास रखडला आहे. 2009 मध्ये इमारती रिकाम्या केल्या. या मोकळय़ा भूखंडाला चारही बाजूने पत्रे बांधले आहेत. बाळकृष्ण सदनमध्ये प्रख्यात प्रकाश हॉटेल होते. त्याच्या शेजारी सायबिणी हॉटेल होते. या सर्व इमारतींमधील 147 भाडेकरूंना दादर सोडावे लागले.

माहीममधील 27 प्रकल्प बंद

माहीम मतदारसंघातील 27 गृहनिर्माण प्रकल्प बंद पडलेत. येथील चार ते पाच हजार कुटुंबे देशोधडीला लागल्याची माहिती या भागातील शिंदे गटाच्या लोकप्रतिनिधीनेच मार्च 2022 मधील अधिवेशनात दिली होती.

सत्ताधाऱयांवर नाराजी

रखडलेल्या जुन्या इमारतींचा म्हाडामार्फत पुनर्विकास आणि विकासकाला काळ्या यादीत टाकण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली, पण इमारतींचा पुनर्विकास करण्याच्या संदर्भात कोणतीही हालचाल दिसत नाही, असे आर. के. बिल्डिंगमधील एका रहिवाशाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.