छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा, तुंबळ हाणामारी

लोकसभा निवडणूक आणि उमेदवार ठरवण्यासाठी बोलावण्यात आलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर तुंबळ हाणामारीत झाले. लोकसभेसाठी उमेदवाराचे नाव सूचवण्यावरून हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात आले.

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून शहरातील मराठा मंदिर मंगल कार्यालयात शुक्रवारी सकाळी 11 वाजता मराठा समाजबांधवांची बैठक बोलावण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार असल्याचे सुरुवातीलाच स्पष्ट करण्यात आले. त्याप्रमाणे उपस्थितांनी नाव सूचवण्यास सुरुवात केली. यावेळी काही जणांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता बैठक बोलावली, असा आक्षेप घेतला. यावेळी एका कार्यकर्त्याने महिला उमेदवाराचे नाव सूचवले. त्याला विरोध झाला. मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारांचे नाव पुढे आले. काही जणांनी विशिष्ट नावांची सुपारी घेऊन आले असल्याचा आरोप केला. यावरून शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. सुपारी घेणारांची नावे जाहीर करा, अशी मागणी काही जणांनी केली. या गोंधळातच काही तरुणांनी विकी राजे याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी तेथे उपस्थित असलेल्या मराठा कार्यकर्त्यांनी हा वाद शमवण्याचा प्रयत्न केला.

मनोज जरांगे यांच्या निर्णयाकडे लक्ष

मराठा आरक्षणासाठी लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचा प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार उभा करावा, असा प्रस्ताव दिला आहे. राज्यभरातील मराठाबांधवांशी चर्चा करून त्यावर 30 मार्च रोजी आपण भूमिका स्पष्ट करणार असल्याचे 24 मार्च रोजी झालेल्या बैठकीत मनोज जरांगे यांनी जाहीर केले होते. या अनुषंगाने आंतरवालीत मराठा समाजबांधवांची बैठक होणार असून, त्यानंतर मनोज जरांगे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आरोप-प्रत्यारोप

बैठकीत प्रस्थापित लोकांचीच नावे समोर आली आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केली. मी काहीही बोललो नाही, असा दावा विकी राजे याने केला. तर विकी राजे याने बैठकीचे संकेत मोडून शिवीगाळ केली, असा आरोप काही मराठा कार्यकर्त्यांनी केला.