राज्यात खुलेआम गुंडाराज ही लाजीरवाणी बाब! उद्धव ठाकरे गरजले

सध्या कुणीही कसाही गोळीबार करतंय, पण या सरकामध्ये त्यांना रोखण्याची हिंमत नाही. राज्यात खुलेआम गुंडाराज सुरू असताना तिथे लक्ष न देता सरकार मत मागत फिरतंय, ही लाजीरवाणी बाब असल्याची घणाघाती टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. कॉलनी फोरमच्या अध्यक्षा आणि पनवेल पालिकेच्या माजी नगरसेविका लीना गरड यांनी सोमवारी शिवबंधन बांधत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीकेचे आसूड ओढले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकार बदलण्याच्या जिद्दीने शिवसेनेत येणारे मावळ्यांची संख्या वाढते आहे. त्यांचं सर्वांच शिवसेनेत ताकद. विशेष म्हणजे हे सगळे पनवेलमधले आहेत. यांचा प्रवेश होत असताना काही गोष्टी मला सांगायच्या आहेत. कारण, निवडणुकीच्या तोंडावर जाहीरनामे जाहीर केले जातात. अनेक अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी करू म्हणून सांगितलं जातं. अशा वेळी मूळचे प्रश्न सोडवणं दूर राहतं आणि भलतंच काहीतरी समोर करून जनतेची दिशाभूल केली जाते. आज शिवसेनेत येणारी ही मंडळी, त्यांच्या ज्या व्यथा आहेत, त्या त्यांच्या एकट्याच्या व्यथा नाहीत. तर लीना ताई लढताहेत, कॉलनी फोरम आहे, शिवसेना पण लढतेय. तिथले जे काही प्रश्न आहेत, त्याबद्दल अनेकदा आंदोलनं झाली आहेत. आजही सुरू आहे, कारण तिथला मालमत्ता कर. हा भरू नये, असं कुणाचंही म्हणणं नाही. पण सिडकोकडून कर वसुली केली जाते, दुप्पट मालमत्ता कर भरावा लागतो, पनवेल महापालिकेकडून तशा कोणत्याही सेवा न देता कर आकारला जातोय. ही दुहेरी कर आकारणी म्हणजे जुलूमशाही आहे. त्याच्या विरुद्ध 2 लाख 80 हजार जनतेने कित्येक महिने निषेध केला आहे. हा कर एका बाजूला जुलूम जबरदस्तीने वसूल करताना खास करून लोढाचं कल्याण-डोंबिवलीचं जे प्रोजेक्ट आहे, पलावा सिटी, त्यांना मात्र करमुक्ती दिलेली आहे. या विषमतेविरुद्ध नागरिक सातत्याने आवाज उठवत आहेत. मी आज त्यांना सांगितलं की, ज्याप्रमाणे मुंबई महापालिकेची 2017ची निवडणूक लढवताना मी मुंबईकरांना वचन दिलं होतं की 500 चौरसफुटापर्यंतचा मालमत्ता कर आम्ही रद्द करू आणि तो करून दाखवला. तसंच, आमचं सरकार केंद्रात आणि राज्यात आल्यानंतर या दुहेरी कराच्या फटक्यातून आम्ही तुम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि मला खात्री आहे की तिकडे जे नागरिक आहेत, त्यांना हाच मोठा दिलासा असेल. परत एकदा सांगतो की कर भरणार नाही ही कुणाची भूमिका नाही, पण काहीच कारण नसताना जो डबल कर वसूल केला जातोय. या वसुली सरकारचा कर आकारणीचा विचित्र प्रकार आहे, तो मात्र आम्ही नक्की थांबवू हे वचन मी देतो आहे, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

भाजपच्या जाहीरनाम्यावरून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने 2014 आणि 2019लाही जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. ते आता फक्त जाहीरनामे प्रसिद्ध करतील. कारण निवडणुकीनंतर ते आता सत्तेत येणार नाहीयेत. त्यामुळे त्यांना काय वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार आहे. तो वाट्टेल ते बोलण्याचा अधिकार कायम राहावा म्हणून आम्ही निवडणूक लढवत आहोत. अमित शहांना मला सांगायचंय की तुमच्या पुत्रप्रेमामुळे हिंदुस्थान क्रिकेटचा अंतिम सामना हरला. तसं पुत्रप्रेम मी तरी अजून दाखवलेलं नाही. आता सध्या भाजपचे अध्यक्ष वेगळे आहेत, त्यामुळे अमित शहांना पक्षात किती अधिकार आहे, ते अध्यक्षच सांगू शकतील. पण, अमित शहांना सांगायचंय की तुमच्या आणि तुमच्या चेले-चपाट्यांच्या बोलण्यात एकवाक्यता असू द्या. कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस बोलले होते की मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. त्यामुळे तुमची लाज तुमचे चेले चपाटे काढताहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, देशात ज्या प्रकारे खुलेआम गुंडाराज सुरू आहे, त्यामुळे घटनाबाह्य सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. कुणीही कसाही गोळीबार करतंय, पण या सरकारमध्ये त्यांना रोखण्याची हिंमत नाही. कुणीही येऊन असा गोळीबार करून जाऊ कसं शकतं? या सरकारचं राज्यावर लक्ष नाही. कुणीही काहीही करतंय, तरीही हे मतं मागताहेत. ही लाजीरवाणी बाब आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मिंधे फडणवीस सरकारवर सडकून टीका केली.