उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्मारतीदरम्यान भीषण आग, 5 पुजाऱ्यांसह 13 जण होरपळले

उज्जैनच्या महाकाल मंदिरामध्ये सोमवारी सकाळी भस्मारतीदरम्यान भीषण आग लागली. या आगीमध्ये पुजाऱ्यासह 13 जण होरपळले आहेत. आरतीदरम्यान गुलाल उधळताच ही आग भडकल्याची माहिती मिळतेय.

सोमवार आणि धुलिवंदन एकाच दिवशी आल्याने महाकाल मंदिरामध्ये पारंपरिक होळी खेळण्यासाठी आणि भस्मारतीमध्ये सहभागी होण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. भस्मारती सुरू असतानाच अज्ञात व्यक्तीने गर्भगृहामध्ये गुलाल उधळला. हा गुलाल दिव्यावर पडल्याने आग भडकली. गर्भगृहातील चांदीच्या भींतीवर लावण्यात आलेल्या फ्लेक्समुळे ही आग आणखी पसरली. मंदिरातील फायर एक्सटिंग्विशरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

या आगीमध्ये गर्भगृहात आरती करणारे पुजारी संजीव, विकास, मनोज, सेवेकरी आनंद कमल जोशी यांच्यासह 13 जण होरपळले आहेत. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. सर्व जखमींवर सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, महाकाल मंदिरामध्ये घडलेल्या या दुर्घटनेची दखल मुख्यमंत्री मोहन यादव आणि उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज सिंह यांनीही घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत. यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे.