वडूजला आठ दिवसाआड पाणीपुरवठा; तोही दूषित

उन्हाची तीव्रता जसजशी वाढू लागली आहे, तसतशी वडूज शहराला तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. लोकांना दररोज पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. नगरपंचायत प्रशासनाकडून आठ दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत असून, हे पाणीही दूषित येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत तातडीने तोडगा काढावा; अन्यथा नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडूज शहराला तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली असून, पाण्यासाठी येथील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सुमारे चाळीस हजार लोकवस्ती असलेल्या वडूज शहराला पाणीपुरवठा करणाऱया येरळवाडी धरणातसुद्धा आता फक्त मृतसाठा शेवटची घटका मोजत आहे. त्यामुळे वडूज शहरात सात-आठ दिवसांतून एकदा पाणी मिळत आहे. हे पाणीसुद्धा गढूळ गाळमिश्रित व दुर्गंधीयुक्त येत असून, त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असून, नागरिक विविध आजारांना बळी पडण्याची शक्यताही निर्माण होत आहे.

दरम्यान, वडूजकर नागरिकांना थोडाफार वॉटर एटीएमचा आधार मिळालेला असून, त्याबरोबरच काही खासगी पाणीविक्रेते शहराला पाणीपुरवठा करत आहेत. तीव्र पाणीटंचाईच्या काळात आता वडूजकरांनाही पाण्याचे महत्त्व समजू लागले आहे. त्यामुळे लोकही पाण्याचा वापर काटकसरीने करू लागले आहेत. परंतु अजूनही काही विघ्नसंतोषी लोक पाण्याबाबत जागरूक नसल्याचे दिसत आहे. अशा या गंभीर पाणीप्रश्नावर प्रशासनाने गांभीर्याने तोडगा काढण्याची गरज आहे. टंचाईकाळात उरमोडी योजनेचे पाणी येरळवाडी धरणात सोडून शहराची व खटाव तालुक्यातील अन्य गावांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवावी. नाहीतर अजूनही पावसाळा सुरू होण्यास दोन-अडीच महिन्यांचा कालावधी लागणार आहे. आगामी काळात परिस्थिती अतिशय गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नगरपंचायत प्रशासनाकडून याबाबत जिल्हाधिकाऱयांकडे पाठपुरावा केला असला तरी यामध्ये पाहिजे त्या प्रमाणात सातत्य दिसून येत नाही. ही बाब वडूजकरांच्या दृष्टीने चिंताजनक आहे. सतरा प्रभागांतील नगरसेवकांनी याबाबत ठोस निर्णय घेणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांमधून उमटत आहेत.

करवसुली थांबवावी

आठवडय़ातून एकदा दूषित पाणी येत असल्याने आणि दुष्काळी सावट असल्याकारणाने सुरू असलेली करवसुली थांबवावी, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.