मालाडच्या काचपाडात आढळला 10 फूटांचा अजगर; रॉक पायथॉन जातीचा सर्प

मालाड पश्चिमेतील काचपाडा येथे बुधवारी रात्री रॉक पायथॉन (Indian Rock Python) जातीचा सुमारे 10 फूट लांबीचा अजगर आढळला. या अजगराची सर्पमित्र अजिंक्य पवार यांनी मोठ्या परिश्रमाने विजेच्या मीटर बॉक्समधून सुटका केली.

काचपाडा येथून बुधवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास मोठा सर्प आढळल्याचा फोन आला. हा साप विजेच्या मीटर बॉक्समध्ये असल्याचे सांगण्यात आले. साप आढळल्याची माहिती मिळताच सर्पमित्र अजिंक्य पवार यांनी 10 मिनिटाच घटनास्थळी धाव घेतली. सापाला काही इजा होऊ नये किंवा विजेचा शॉक लागू नये आणि त्याची सुरक्षित सुटका करण्यात यावी, यासाठी पवार यांनी खूप प्रयत्न केले. 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर सर्पमित्र अजिंक्य पवार यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावत या अजगराला सुखरुप पकडले. हा अजगर सुमारे 10 फुटांचा आहे. तसेच तो रॉक पायथॉन (Indian Rock Python) या प्रजातीतील आहे.

हा जगातील बिनविषारी सर्प आहे. पायथॉन मोलुरस हे या जातीचे शास्त्रीय नाव आहे. याला रॉक पायथॉन असेही म्हणतात. या सापाची लांबी 16 फुटापर्यंत वाढते. या सर्पाचे वैशिष्ट म्हणजे प्रथम तो भक्ष्यावर झडप मारून त्याला पकडतो. त्यानंतर त्याभोवती शरीराची वेटोळी गुंडाळून आवळत राहतो. भक्ष्याला हालचालच नव्हे, तर श्वासोच्छ्वासही करता येऊ नये अशा रीतीने जखडून भक्ष्याला गुदमरून मारतो. त्यानंतर त्याला डोक्याच्या बाजूने गिळण्यास सुरुवात करतो.