ड्रग्जसाठी लागणारे 11 लाखांचे केमिकल जप्त; सांगली पोलिसांचा मांजर्डेत छापा

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तासगाव तालुक्यातील मांजर्डे येथे छापा घालून ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारे साडेअकरा लाखांचे केमिकल जप्त केले. हे केमिकल कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथील ड्रग्ज कारवाईशी संबंधित असून, संशयितांनीच ठेवले होते.

पोलिसांच्या मुंबई गुन्हे शाखेने 23 मार्चला इरळी येथे कारवाई करीत मोठा ड्रग्जसाठा जप्त केला होता. या कारवाईत प्रवीण ऊर्फ नागेश रामचंद्र शिंदे (रा. बलगवडे, ता. तासगाव), प्रसाद मोहिते (रा. मांजर्डे, ता. तासगाव) आणि इतर चारजणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर रविवारी मांजर्डे येथील दत्तनगर ते वायफळे रोडजवळ बाळासाहेब मोहिते यांच्या घरालगत पत्र्याच्या शेडमध्ये द्रवपदार्थाचा साठा करून ठेवला आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक रितू खोखर, तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी तासगावचे निवासी नायब तहसीलदार धनश्री स्वामी, अन्न व औषधचे निरीक्षक कारंडे, वालचंद कॉलेजचे प्राध्यापक अनिल पोवार आणि पंचांना बरोबर घेऊन छापा टाकला. या कारवाईत संशयास्पद द्रवपदार्थ ‘क्लोरोफॉर्म’ने भरलेले एकूण 280 किलोग्रॅम वजनाचे एकूण 15 बॅरेल व संशयास्पद द्रवपदार्थ असलेले 40 लिटर क्षमतेचे एकूण 12 कॅन असा एकूण साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई गुन्हे शाखेने इरळी येथे कारवाई करून अटक केलेल्या प्रसाद मोहिते याच्या घराशेजारील पत्र्याच्या शेडमधून हा साठा जप्त केला आहे. हा साठा इरळी येथील मुख्य संशयित प्रवीण ऊर्फ नागेश शिंदे व प्रसाद मोहिते यांनी काही दिवसांपूर्वी लपवून ठेवला होता.